Press "Enter" to skip to content

जिल्हा परिषदेच्या जागेसंदर्भातील भाडेपट्टी व अतिक्रमणाची चौकशी करावी

पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांची मागणी

सिटी बेल | उरण |

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या उरण शहरातील भर नाक्यावरील खिडकोली नाका(राजपाल नाका) येथील जागेवरील भाडेपट्टी व अतिक्रमण याची सखोल चौकशी करून दोषींवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी उरण पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांनी केली आहे.     

जिल्हा परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालकी हक्काची जागा उरण शहरातील भर नाक्यावरील खिडकोली नाका(राजपाल नाका) येथील जागा भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे. परंतु सदर जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेली आहेत. या संदर्भात गेली अनेक वर्षांपासून कोणताच शासकीय अधिकारी वर्ग कारवाई करताना दिसत नाही. उलट काही सामाजिक संघटना, कार्यकर्ते व पत्रकारांनी यांची विचारणा करून चौकशीची मागणी उरण पंचायत समिती अधिकारी वर्गाकडे करूनही संबंधित अधिकारी वर्ग चालढकलपणा करताना दिसत आहेत.      

उरण पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांनी  सदर जागेच्या भाडे किती जमा झाले व  थकीत भाडेपट्टी किती आहे, याची विचारणा केली होती. परंतु याचे उत्तर उपस्थित कोणत्याही अधिकारी वर्गांनी आजतागायत दिलेले नाही.  तसेच सदर जागा नगपालिका हद्दीत असल्याकारणाने त्यांनी कारवाई करावी असे उरण पंचायत समितीने मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी करूनही तेही प्रतिसाद देत नाहीत. यावरून सदर जागेसंदर्भात अधिकारी वर्गाचे आर्थिक साटेलोट असल्याचा संशय ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.     

गेली कित्येक वर्षांपासून या भाडेपट्टी जागेची माहिती मागवूनही कोणीही अधिकारी यांची माहिती देताना दिसत नाही. काही अधिकारी वर्ग तर येथून आपला आर्थिक सबंध ठेवून बदली करून गेले आहेत. तरीही या जागेमध्ये काय गौडबंगाल आहे हे उघड होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.    

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांनी याची सखोल चौकशी करून आजतागायत किती भाडे जमा झाले व किती भाडे थकीत आहे. याची माहिती उघड करून कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर अतिक्रमण केले आहेत ती तोडण्यात यावी व आर्थिक साटेलोटातून त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांनी केली आहे.  या बाबत उरण पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.