Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहण्याचे तहसीलदार अंधारे यांचे जनतेला आवाहन

उरण तहसील कार्यालयात शासकीय अधिकारी व उरणमधील डॉक्टर यांची बैठक

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

राज्याला आता करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. सरकारने देखील तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करत या लाटेशी दोन हात करता यावेत यासाठी तयारी सुरू केली आहे. तिसरी लाट केव्हा येण्याची शक्यता आहे, याबाबत तज्ञ विविध मते व्यक्त करीत आहेत. या तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी सतर्क राहून नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी उरणच्या जनतेला केले आहे. या संदर्भात आज तहसील कार्यालयात शासकीय अधिकारी व उरणमधील डॉक्टर यांची बैठक घेण्यात आली होती.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या स्थिरावल्यासारखी दिसत असली तरी देखील या संख्येत चढ-उतार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशात केरळनंतर महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या दुसऱ्या स्थानी आहे. सध्या राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५२ हजार ८४४ वर आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येने उचल खाल्ल्याचेही दिसत आहे. आता सणासुदीचे दिवस येत असून या दिवसांमध्ये लोकांचा संपर्क वाढल्यास करोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आज उरण तहसील कार्यालयात या संदर्भात महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत जनतेला सतर्क राहण्यासाठी सर्वांनी तोंडावर डब्बल मास्क लावणे, कोरोना लसचा दुसरा डोस सर्व जनतेने लवकरात लवकर घेऊन स्वतःला व आपल्या कुटुंबासहीत जनतेला सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावर शासकीय अधिकारी व डॉक्टर मंडळी यांची चर्चा झाली. यासाठी उरणमधील सर्व डॉक्टरांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार अंधारे यांनी केले असता उपस्थित डॉक्टरांनी यास सहमती दर्शविली आहे.

या बैठकीला तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. देसाई, डॉ. राजेंद्र इटकर, डॉ. भोसले, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे, डॉ. सुरेश पाटील, सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे, डॉ. सिप्पी, डॉ. गुंठे, डॉ. बोन्द्रे, डॉ. वीर, डॉ.भावसारे, डॉ. धबधडे, डॉ. मढवी, डॉ. बुबरे, डॉ. गाडे मॅडम, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. पंकज पाटील, डॉ. नाखवा, डॉ. सचिन गावंड, डॉ. चौधरी आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.