Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश हा केवळ जनहित केंद्रस्थानी ठेवूनच

भारतीय काँग्रेस पक्षात मी कोणावरही नाराज नाही : सुदाम पाटील यांची त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टोक्ती

सिटी बेल | पनवेल |

भारतीय काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या कार्य प्रणाली ने प्रेरित होऊन पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत ताहीर पटेल, शशिकला सिंग, अमित लोखंडे, सुदेशना रायते,वीर सिंग, विनीत कांडपिळे,जयश्री खटकाले,अतुल वाघमारे अशा प्रभावशाली नेत्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षामध्ये सध्या कमालीचे अस्वस्थ असे वातावरण आहे.

काँग्रेस पक्षात नक्की कोणावर सुदाम पाटील नाराज आहेत ? याचा छडा लावण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांनी जंग जंग पछाडत सुदाम पाटील यांना अनेक डायरेक्ट आणि इन डायरेक्ट प्रश्न विचारले. प्रसिद्धी माध्यमांतील या उलट सुलट चर्चा थांबविण्याचे हेतूने सुदाम पाटील यांनी आपल्या भूमिकेबाबत माध्यमांना अवगत केले.

सुदाम पाटील म्हणाले की भारतीय काँग्रेस पक्षाने मला आणि माझ्या कुटुंबाला भरभरून दिले आहे. त्यामुळे त्या पक्षातील कुणा नेत्यावर अथवा नेतृत्वावर नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझे पक्ष प्रवेशाच्या वेळी स्पष्टपणे सांगितले की या दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच आहेत. परंतु कार्यकर्त्यांना सक्षम बनविण्याची यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिक जोमाने कार्यान्वित आहे. मला असे वाटते की राजकारण करत असताना त्यात समाजकारणाचा हिस्सा हा अधिक असला पाहिजे. आपले समाज कारण जेव्हा जनताभिमुख असते तेव्हा त्या कार्याची पब्लिसिटी करावी लागत नाही. आपल्या उदात्त हेतूने केलेल्या समाजकारणाची दखल जनता अवश्य घेते. अशाच स्वरूपाचे काम आज रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे करत आहेत. महा विकास आघाडीतील घटक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांचे काम जवळून पाहण्याची संधी मला गेल्या दोन वर्षात प्राप्त झाली. विरोधकांची कामे करताना सुद्धा त्या मागे पुढे पहात नाहीत. म्हणूनच त्यांची कार्यपद्धती मला प्रभावित करते.

जनतेच्या समस्या दूर करणे, अडलेल्या नडलेल्याला उचित मदत मिळवून देणे, अन्यायग्रस्त व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवून देणे, कार्यकर्त्यांना पाठबळ देणे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पक्ष संघटना मजबूत करणे ही माझी आज वरची कार्यपद्धती राहिली आहे. यापुढे देखील ती अशीच अबाधित राहील. मी कुणावर नाराज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलेतरी घसघशीत पद मिळावे यासाठी देखील मी पक्ष प्रवेश केलेला नाही. माझी वैचारिक बैठक अत्यंत भक्कम आहे. माझ्या घरातून माझ्यावर उत्तम विचार धारेचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे पदाने एखाद्या व्यक्तीची शोभा वाढत नाही, तर व्यक्तीच्या प्रामाणिक कामामुळे त्या पदाचा उचित सन्मान राखला जातो! या विचारावर माझी अत्यंत प्रामाणिक श्रद्धा आहे.

खासदार सुनील तटकरे साहेब आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाने येथून पुढे मी मार्गक्रमण करणार आहे. महा विकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात अत्यंत नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली आहे. कोरोना विषाणू मुळे आलेले निर्बंध असोत, फयान, तोक्ते सारखी चक्री वादळे असोत किंवा ओढवलेले पुराचे संकट असो हे सरकार भक्कमपणे नागरिकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरगोस सहकार्य करत आले आहे.

माझ्या पक्ष प्रवेशाची खोलात जाऊन चिकित्सा करणाऱ्यांना मी तूर्तास एवढेच सांगेन की नागरिकांच्या पुढे अनेक समस्या आहेत, त्या सोडविणे हे माझे प्राधान्य आहे. त्या कामासाठी मला मनःपूर्वक शुभेच्छा द्या एवढीच विनंती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.