सामाजिक कार्यकर्त्या मोनिका बडेकर यांचा पुढाकार : 145 जणांनी घेतला लाभ
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील किरवली ठाकूरवाडी आणि उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आषाणे ठाकुरवाडी मधील आदिवासी बांधवासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या त्या वाडीवर जाऊन हे लसीकरण करण्यात आले.
शहरी भागात लसीकरण शिबिरे मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत, मात्र ग्रामीण विशेषतः आदिवासी वाड्या- पाड्यावर ती घेतली जात नाहीत, आणि अजून त्या बांधवांमध्ये जनजागृती नसल्याने ते लसीकरणाकडे वळत नाहीत. या गोष्टीचा विचार करून सामाजिक कार्यकर्त्या मोनिका निलेश बडेकर यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.
कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की, उद्योजक निलेश बडेकर, सरपंच संतोष सांबरी, माजी पंचायत समिती सदस्य भालचंद्र सांबरी यांनी शिबिरास भेट दिली. उप जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका ज्योती वाव्हळ, केवल वारीक यांनी लसीकरण केले.145 जणांनी कॉवाक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. किरवली ठाकूरवाडी आणि आषाणे ठाकुरवाडी मध्ये जाऊन लसीकरण करण्यात आले. लसीकरण आपल्या दारी त्यामुळे आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
Be First to Comment