Press "Enter" to skip to content

उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड दौऱ्यावर असताना माजी आमदारांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांचा राजीनामा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

घुसमट आणि प्रकृती कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आज दुपारी राजीनामा दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज रायगड च्या दौ-यावर असताना सुरेश लाड यांनी राजीनामा दिला याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

माझी नुकतीच शस्त्रक्रिया झाली आणि डॉक्टरांनी मला अजून एक – दीड महिना आराम करायला सांगितले आहे. त्यामुळे मी आगामी निवडणुका जवळ आल्याने पक्ष संघटनेसाठी वेळ देऊ शकत नाही. तसेच राज्यात आमची महाविकास आघाडी आहे. वरच्या पातळीवर आघाडी करावी असे जाहीर करण्यात आले. मात्र या मतदार संघात आगामी निवडणुकांसाठी ती व्हावी असे मला वाटत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी माझी अडचण होऊ नये. या साऱ्या प्रकारात खरे तर माझी घुसमट होते. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तरी सुद्धा मी माझ्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी काम करीत राहीन. पक्षाचे नुकसान होऊ नये हा माझा हेतू आहे. असे लाड यांनी स्पष्ट केले.

दहिवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ‘मी कुणालाही काहीही न सांगता माझा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष कार्यालयात पाठविला आहे. तो कार्यालयात पोहोचला आहे. मी राजीनामा देणार आहे. अशी पुसटशी शंका जरी वरिष्ठ नेतृत्वाला आली असती तरी मला राजीनामा देण्यापासून त्यांनी प्रवृत्त केले असते. म्हणून मी आज सकाळीच माझे राजीनामा पत्र थेट प्रदेश कार्यालयात पाठवले. इथल्या शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची भूमिका माझ्या विषयी वेगळी आहे. काही महिन्यांपूर्वी प्रशासकीय भवन भूमिपूजन सोहळा पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह वापरून केला. यावरून झालेला प्रकार निदर्शनास आणण्याचा मी प्रयत्न केला. मात्र शिवसेनेत गेलेले एकेकाळचे माझेच पूर्वीचे कार्यकर्ते माझा निषेध करून मला शिकवू पहात असतील तर ते मी कसे सहन करणार? शिवाय पालक मंत्री व खासदारांनाही न मानणारे येथील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आघाडीचा धर्म पाळत नाहीत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी परस्पर बैठका घेऊन आघाडीचा प्रयत्न करतात. कधी शेकापक्षाशी युतीची भाषा तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीची भाषा त्यांची असते. माझ्यामुळे कोणताही निर्णय घेण्यात अडचण होऊ नये म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.’ असेही लाड यांनी सांगितले.

तुम्हाला एखादे महामंडळाचे अध्यक्षपद मिळणार आहे म्हणून तुम्ही राजीनामा देताय काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर ‘मी कोणत्याही महामंडळाच्या अध्यक्षपदाची मागणी केली नाही आणि तरीही मला पक्षाने ते दिले तरी मी ते स्वीकारणार नाही.’ असे स्पष्टपणे लाड यांनी सांगितले. तुम्ही आगामी विधानसभा निवडणुक लढविणार काय? यावर ‘अभी तो दिल्ली बहोत दूर है’ असे उत्तर दिले. ‘मी राजीनामा दिल्याने आता मोकळा झालो असून सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही. त्यासाठी प्रयत्न करीन.’ असेही सांगितले. तुम्ही राजकीय संन्यास तर घेत नाही ना? असा प्रश्नही पत्रकारांनी त्यांना विचारला त्यावेळी त्यांनी, ‘मी माझ्या जिवलग व सच्च्या कार्यकर्त्यांसाठी काम करीत राहीन असे त्यांनी सांगितले.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगड मध्ये असतानाच जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.