अक्षर बिल्डर विरोधात इस्टोनिया रहिवाशांचे धरणे आंदोलन
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
अक्षर बिल्डरांनी रहिवाशांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे सोयी सुविधा न दिल्या प्रकरणी येथील स्थानिक इस्टोनिया रहिवाशांनी आज धरणे आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. या प्रकरणी अक्षर बिल्डर बरोबर सिडकोही तितकीच जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती इस्टोनिया रहिवाशांनी पत्रकारांना दिली. आम्ही यापूर्वीच आमच्या लेखणीने ग्राहकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अशा अनेक इमारतींची भविष्यात अवस्था यापेक्षा भयानक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी बिल्डर लॉबिंकडून मोठमोठे टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. परंतु बिल्डर लॉबीने सिडकोकडून घेतलेल्या कागदोपत्री परवानगी नुसार काम होणे बंधनकारक असतानाही या नियमाला तिलांजली देऊन सिडको अधिकारी व बिल्डर यांच्या संगनमताने काम सुरू आहे. इमारतींचे फायलिंगही वरच्यावर करून इमारती उभ्या रहात आहेत. मटेरियलही निकृष्ट दर्जाचे व पाणी ही खारे वापरले जात आहे. त्यामुळे वर्षभरातच बांधकाम व आतील मटेरियल खराब असल्याचे उघड झाले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव अक्षर बिल्डींगमधील रहिवाशांना आला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
अक्षर इस्टोनिया इमारतींमध्ये ४ विंग असून एकूण ३५४ सदनिका आहेत. त्यापैकी १५० सध्या वास्तव्यास आहेत. परंतु ज्यावेळी बिल्डरकडून सदनिका खरेदी करार केला त्यावेळी ज्याज्या अमीनेशन दिल्या होत्या. त्याची आज एक दीड वर्षेहोऊनही त्याची पूर्तता बिल्डरने केलेली नाही उलट आमची फसवणूक केली असल्याचा आरोप इस्टोनिया रहिवाशांनी केला. बिल्डरने पाणी, अग्निशमन यंत्रणा, गेस्ट पार्किंग, STP, सोलर सिस्टम, इंटरकॉम, चुकीचा जमाखर्च, अतिक्रमण झालेल्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष, दुकानाची भिंत, D 102 ची भिंत, रेन हार्वेस्टिंग आदींसह अनेक समस्यांचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. पाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होता पण हा पाणी कुठून आणतात याची काहीच माहिती नसल्याने नाईलाजस्तव पाणी वापरावे लागत असल्याचे रहिवाशी सांगतात.
या होत असलेल्या त्रासाला अक्षर बिल्डर जितका जबाबदार आहे तितकीच जबाबदारी सिडकोचीही आहे. आजच्या आंदोलनाचे पत्र बिल्डरने स्वीकारले नसल्याने त्याच्याकडून काय अपेक्षा करणार.

रहिवाशांनी आंदोलनाचे हत्यार उचलण्याचा हा कदाचित पहिलाच प्रकार असावा. आंदोलन करण्याची आम्हाला हौस नाही पण बिल्डर जेव्हा कामं करत नाही तेव्हा आमच्याकडे पण पर्याय उरला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
या आंदोलनातून काही निष्पन्न झाले नाही तर सिडको भवन आणि अक्षरची ज्या ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या त्या ठिकाणी उग्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील असा इशाराही यावेळी धरणे आंदोलनाची सांगता करताना देण्यात आला.
यावेळी रहिवाशी राजा पाटील, प्रशांत भगत, भीमराव केदार, डॉ. किरण बाबरे, डॉ. सिप्पी, प्रमोद ठाकूर, प्रितेश म्हात्रे, डी. एस. पाटील आदींसह अनेक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment