चांदरात
लहरून मंदवात,
बहरून गंध आला,
उसवून स्वप्न माझे,
मज जागवून गेला
हळुवार पावलांनी,
बघ चांदरात आली,
प्रीती तुझी तशी ती,
मज ना कधी कळाली
चाहूल चांदण्याची,
घेऊन मी निघाले,
तूज भेटण्या सख्या रे,
आतुर मन जहाले
पाहूनी तो इशारा,
फुलवी कसा शहारा,
लाजवून मज सुखाने, मोहवून आज गेला
स्पर्शात सख्या तुझ्याही, जादूच काय आहे,
सुखवून रोमरोमी,
नाहूनी मी निघाले
नाहुनी चांदण्यात,
मन तृप्त आज होई,
बहरून अंगणात,
सजली पहा ही जाई
पाहुनी मन मोहनाला, ऐकुनी मुरली रवाला, लाजुनी मीही वदले,
तो कृष्ण सखा बघ आला, तो कृष्ण सखा बघ आला
कवयित्री: अनिता कुलकर्णी, नवीन पनवेल
Be First to Comment