शारदीय नवरात्र नववी माळ
आज नववी माळ, आज विजयादशमी, दसरा. आज शस्त्रपूजन करतात. आज सीमोल्लंघन करून सोने लुटण्याचा दिवस.
आज अष्टभुजा महिषासुरमर्दिनी डोळ्यासमोर उभी आहे. दुष्ट शक्तींचा विनाश करणारी, भक्तांना तारणारी जगदंबा आज पोलीस, सेनादले, अग्निशमन दले अशा आघाड्यांवर लढते आहे. आज स्त्री काम करत नाही असे क्षेत्र शोधून काढावे लागेल. पोळी-भाजी केंद्रासारखा छोटासा पारंपरिक स्त्री उद्योग असो की मंगळावर यान पाठवण्याचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प, स्त्री प्रत्येक ठिकाणी तिचा ठसा उमटवत आहे. औषध निर्मिती, वस्त्रोद्योग, मौल्यवान रत्नोद्योग, बँकिंग सेवा अशा काही क्षेत्रात तर स्त्रियांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. स्त्री मुळातच हुशार पण आधुनिक शिक्षणाने तिच्या बुध्दीला अनेक पैलू पाडले. स्त्रिच्या कर्तृत्वाचा हा अश्वमेध आता विश्वविजय करूनच थांबेल.
पण, हा प्रवास इतका सोपा नाही, आज एकविसाव्या शतकातही स्त्रिला हीन लेखणारे, वाईट वागणूक देणारे असंख्य महाभाग आहेत. ज्या देशाची राष्ट्रप्रमुख एक स्त्री होती, त्याच देशात तिला जन्म घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ज्या देशाच्या संरक्षणमंत्री एक महिला होत्या, त्याच देशात महिला अतिशय असुरक्षित आहेत. ज्या देशाच्या अर्थमंत्री एक महिला आहेत, त्याच देशात स्त्रिला एक एक रूपयाचा हिशोब तिच्या पतीला द्यावा लागतो. कौटुंबिक हिंसाचार आणि समाजकंटक लोकांच्या हिंसेची बळी पण स्त्रीच आहे.
खरं तर स्त्री आणि पुरूष पृथ्वीरूपी पक्षाचे दोन पंख आहेत, एक पंख जर तुटला, जखमी झाला तर पक्षी कसा भरारी मारेल?? शिव – शक्तिच्या संगमानेच हे जग अस्तित्वात आहे, सुंदर झाले आहे. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, वर्तमान सुंदर होण्यासाठी स्त्रिला पुरूषांच्या बरोबरीची वागणूक मिळाली पाहिजे. तिचा आदर केला गेला पाहिजे आणि ही सुरूवात आपण स्वतःपासून करायला हवी. आपल्या आजूबाजूच्या सर्व स्त्रियांना आपण यथोचित आदर द्यायला हवा. तिला आचार – विचार स्वातंत्र्य द्यायला हवे.
आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्त्रीबद्दलच्या बुरसटलेल्या विचारांचे सीमोल्लंघन करूया. नवीन उमद्या विचारांचे सोने लुटूया. अविचारांचा रावण जाळून सीतारूपी नारीचा सन्मान करूया. तरच खऱ्या अर्थाने ती जगदात्री प्रसन्न होईल. सुख समृद्धीने आपले जीवन गोड होईल जेव्हा आपण प्रत्येक स्त्रिच्या चेहऱ्यावर गोड हसू आणू शकू, स्त्रीसन्मान करणे हीच खरी देवीची उपासना.
“उदयोस्तु जगदंब”
सौ. पौर्णिमा दीक्षित
सेक्टर १५-ए, नवीन पनवेल
Be First to Comment