शारदीय नवरात्र आठवी माळ
आज आठव्या माळेला अष्टभुजा नारायणी मातृरुप घेऊन आली आहे. आईच्या मायेला ना अंत ना पार, लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी, स्वतः त्रास सोसून मुलांसाठी सुखाच्या पायघड्या घालणारी आई. जिचे पांग फेडायला सात जन्म पुरणार नाहीत, जिचे वर्णन करायला जगातील कोणतीही भाषा पुरी पडणार नाही, तिच्याबद्दल काय लिहू ?
स्त्रीजन्मच मला वाटते, मातृरुप असतो. तीन-चार वर्षांची छोटीशी मुलगी जेव्हा बाहुली घेऊन खेळत असते तेव्हा किती मायेने, प्रेमाने ती त्या निर्जीव बाहुलीशी खेळत असते. जसजशी मुलगी मोठी होत जाते, विविध नाती तिला मिळत जातात तिचं मायाळूपण ठळकपणे दिसू लागते. ताई, माई, आत्या, मावशी विविध रूपांनी ती प्रेमाची पखरण करत असते. तिच्या विवाहानं ती काकू, मामी होते आणि माहेरासोबतच सासरच्याही चिमण-जीवांना जोडून घेते.
जेव्हा तिला स्वतःला आई होण्याची चाहूल लागते, तेव्हापासून ते तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती फक्त आईच असते. तिच्या ध्यानी, मनी, स्वप्नी तिचं मूलच असतं. कोणत्याही गोष्टीत ती सर्वप्रथम आपल्या मुलांचाच विचार करते. ती सासू झाल्यावर तिला सून आणि जावई यांच्या रूपाने आणखी एक मुलगी आणि मुलगा मिळतात. आणि नातवंडं म्हणजे तर दुधावरची साय. त्यांच्यासाठी काहीही करताना तिचा उत्साह ओसंडून वाहात असतो.
काहीवेळा काही कारणांनी दिव्यांग मुले पदरी येतात. तेव्हा ती आई त्या मुलांसाठी जे कष्ट उपसते त्याला तोड नाही. आपलं मूल जगावेगळं आहे, त्याच्याबद्दल आपण पाहिलेली स्वप्नं कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीत हे पूर्णपणे माहिती असूनही आई जे काही करते ते तो परमेश्वर तरी करेल का?
आईचं विस्तारीत रूप म्हणजे अनाथ जीवांना आपल्या मानून त्यांचा आधारवड होणाऱ्या माऊली. सिंधूताई सपकाळ, साधना आमटे, राणी बंग किती नावे घ्यावीत? दीन-दुबळ्यांचे अश्रू पुसणाऱ्या, वंचितांना आपले मानून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या सगळ्या मातांचे आपल्या समाजावर अनंत उपकार आहेत.
माणूस कितीही खंबीर असला तरी आई हा त्याच्या मनाचा हळवा कोपरा असतो. आई म्हणजे संपूर्ण विश्व, आई म्हणजे प्रेमाचा महासागर, आई म्हणजे अमृतकुंभ. अशा या आईरूपी जगदंबेला साष्टांग दंडवत.
सौ. पौर्णिमा दिक्षित
सेक्टर १५-ए,नवीन पनवेल
Be First to Comment