Press "Enter" to skip to content

आज सहावी माळ

शारदीय नवरात्र सहावी माळ

आज षष्ठी. आज अंबामातेकडे भाव-भक्तिचा जोगवा मागायचा. आज ती जगदात्री मदतनीस म्हणून पदर खोचून उभी आहे.

आपण मध्यमवर्गीय, नवरा-बायको दोघेही अर्थार्जन करण्यासाठी दिवसभर बाहेर असतात. घरी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असतात. घरातली कामे कधीच संपत नाहीत. एक संपलं की दुसरं पुढे उभंच असतं. मग कार्यालय वेळेत गाठायचं असेल तर घरच्या कामात मदत घेण्यावाचून पर्याय नसतो. आणि मग ही अंबा धावून येते कामवाल्या मावशींच्या रूपात.

गरीब किंवा निम्न मध्यम वर्गातून आलेल्या या बायका कामाला भारीच असतात. केर-वारे, भांडी – कपडे त्या लीलया हातावेगळी करतात. पटकन पाच-सात माणसांचा स्वयंपाक करतात. एका घरचे काम संपवून लगेच दुसर्‍या घरी जातात. सणासुदीला जास्तीची साफसफाई करून देतात. आपल्याकडे पै-पाहुणे आले की, जास्त पडणारी भांडी, घरभरचा पसारा आवरून ठेवतात.

भल्या सकाळी उठून स्वतःच्या घरची कामे उरकून सकाळी लवकर त्या आपल्याकडे कामाला हजर असतात. दिवसभर राबून संध्याकाळी पुन्हा घरची राहिलेली कामे करतात. आर्थिक चणचण, नवऱ्याची व्यसनाधीनता, सासुरवास अशा असंख्य समस्यांशी त्यांना रोज सामना करावा लागतो. पण, त्यांची जगण्याची उमेद अत्यंत तीव्र असते. सगळे सणवार त्या त्यांच्या परीने नीट साजरे करतात. असेल त्या परिस्थितीत आनंदाने रहाण्याचं बाळकडूच जणू त्यांना मिळालेलं असतं.

आपण जे हे काम करतो, ते आपल्या मुलांना करावं लागू नये. मुलांनी जास्तीत जास्त शिकावं, चांगली नोकरी करावी. ही मात्र या सगळ्या मावशींची इच्छा असते.

अष्टभुजा नारायणीसारखी ही सखी नेहमी आपल्या मदतीला तत्पर असते. तिने सुट्टी घेणं म्हणजे जणू आपला एक हात मोडल्यासारखं होतं. अशा या मावशीला कधीतरी “दमल्यात हो जरा बसा, हा गरम चहा घ्या” हा जादूचा मंत्र म्हणून बघा मंडळी, ती जगदंबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल.

सौ. पौर्णिमा दीक्षित
सेक्टर १५-ए,नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.