मिशन कवचकुंडल अभियान यशस्वी करूया – तहसीलदार खालापूर
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कोविड-१९ लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया व सर्व जनतेच्या भल्यासाठी कवचकुंडल तयार करूया,असे आवाहन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.
शासनाने ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१ या काळावधीत कोविड-१९ लसीकरण साठी विशेष मोहीम हाती घेतली असून याकाळात लसीकरणाचे डोस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून या आठवड्यात लस घेण्यापासून कोणीही रहाणार नाही याची काळजी घेतली जाणार असून यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विस्तार अधिकारी यांची खास बैठक खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली होती.
त्यावेळेस मार्गदर्शन करताना तहसीलदार आयुब तांबोळी बोलत होते.११ ऑक्टोबर रोजी खास महिलांसाठी लसीकरण करण्यात येणार असून ही मोहीम यशस्वी करा,असे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी सांगितले. उपसभापती विश्वनाथ पाटील यांनी आदिवासी भागात यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. तर उपसभापती विश्वनाथ पाटील यांच्या माध्यमातून माडप भागात आदिवासी लसीकरण पूर्ण होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा पाईकराव यांनी सांगितले, त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यापेक्षा गावातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, सामाजिक कार्यकर्ते,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर,महिला व बालविकास विभाग यांनी विशेष प्रयत्न केल्यास लसीकरण मोहीम यशस्वी होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
खालापूर वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते व त्यांचे सहकारी यांनीही आदिवासी भागात लसीकरण जनजागृती करीत असल्याचे सभापती सौ.वृषाली पाटील यांनी सांगितले.बैठकीस विस्तार अधिकारी शिंदे,तांडेल, अधीक्षक चोपडे,म्हसकर यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Be First to Comment