शारदीय नवरात्र
चौथी माळ
आज चौथी माळ! यंदा या दिवशी ललितापंचमीचे पूजन होणार आहे.
आज चौथ्या माळेला भवानी आई “सर्वबाधाहरिणी” होऊन आली आहे. आजचे रुप आहे-रूग्णसेविका! मग ती डॉक्टर असो, वा परिचारिका किंवा त्यांची मदतनीस!
आपल्या आईच्याही आधी आपल्याला प्रत्यक्ष पाहणारी व्यक्ती म्हणजे जिथे आपला जन्म झाला त्या दवाखान्यातील डॉक्टर, परिचारिका आणि आया. त्यांनीच आपल्याला या जगात यायला मदत केलेली असते. आपण जेव्हा पहिला टाहो फोडतो, तेव्हा त्यांनीच आपल्याला कुशीत घेतलेलं असतं. पहिली आंघोळ घातलेली असते. “आमच्या ड्युटीच्या वेळी झालेलं हे बाळ किती छान आहे” म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांसमोर भाव खाल्लेला असतो.
तर अशा या डॉक्टर, परिचारिका, आया अहोरात्र रूग्णसेवा करत असतात. आपला – त्यांचा परीचय लहानपणीच्या किरकोळ आजारापासून सुरू होतो. वयाच्या विविध टप्प्यांवर विविध आजारांमध्ये त्या आपल्यावर उपचार करतात. आपली स्वच्छता करून देतात. शुश्रूषा करतात. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा गात्रे थकतात तेव्हा त्या आई होऊन घास ही भरवतात.
ह्या सर्व स्त्रियांना त्यांचे संसार, मुले-माणसे असतात. घरचा सर्व व्याप सांभाळून वेळच्यावेळी त्या त्यांच्या कर्तव्यावर हजर असतात. अतिशय किचकट काम त्या हसतमुखाने करतात. रूग्णांना धीर देतात. आत्ताच्या जागतिक महामारीच्या काळात जेव्हा आपण सगळेच WFH होतो, तेव्हाही कधी त्यांनी सुट्टी घेतली नाही. उलट नेहमीपेक्षा कितीतरी जास्त काम त्यांनी केले. वेळप्रसंगी घरदार विसरून कामाच्या ठिकाणी राहून अखंड सेवा दिली. त्यांच्या अथक कष्टांनी आणि चिकाटीने अखिल मानवजात या जीवघेण्या संकटातून तरली. स्वतःला संसर्ग होण्याचा, स्वतःच्या मुला-माणसांना जीवाचा धोका होण्याचा संभव असूनही या साऱ्या लढत राहिल्या. ती जगदंबा तरी काय वेगळे करते हो?? आपल्या लेकरांसाठी जीवावर उदार होऊन लढते.
तर अशा या रूग्णसेविका रूपासमोर आपण सर्व नतमस्तक होऊया.
सौ. पौर्णिमा दीक्षित
सेक्टर १५-ए, नवीन पनवेल
Be First to Comment