Press "Enter" to skip to content

ऐतिहासिक पनवेल तालुका : पनवेल तालुका विषयी तुम्हाला “हे” माहीत आहे का ?

वाचा पनवेल तालुक्याची संपूर्ण माहिती : ओळख करून घ्या तुम्हाला माहिती नसलेल्या पनवेलची

सिटी बेल | स्पेशल रिपोर्ट |

रायगड जिल्ह्यातील आर्थिक,सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा तालुका म्हणजे पनवेल तालुका.जिल्ह्याचे मुख्यालय जरी आलिबाग येथे असले तरीही विकासाच्या मोजपट्टीवर त्या तुलनेत दहा पावले पुढे असलेला हा तालुका.या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ६१३ वर्ग की मी असून त्यातील ५३२.३४ वर्ग की मी क्षेत्र ग्रामीण विभागात आहे,तर ८०.४७ वर्ग क्षेत्र शहरी विभागात आहे.अर्थातच तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणजेच तहसिलदार कार्यलय पनवेल येथे असून सध्या विजय तळेकर तहसिलदार आहेत.तालुक्याचे पोलीस ठाणे पनवेल शहरात असून सध्या तेथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र दौंडकर कार्यरत आहेत.

२०११ च्या जन गणनेनुसार पनवेल तालुक्याची लोकसंख्या ५,७०,२१६ असून त्यात ३,०४,७४४ पुरुष आहेत तर २,५६,४७२ महिला आहेत.तर २०२१ च्या आधार कार्ड नोंदणी नुसार पनवेल ची लोकसंख्या सध्या ७,०७,०६८ असल्याचे स्पष्ट होते.तालुक्यात १,७६,3६४ घरांची नोंद असून यातील १,२०,०२५ घरे शहरी विभागात असून ५६,३३९ घरे ग्रामिण विभागात आहेत.

पनवेल जवळजवळ ६०० वर्ष जुने आहे असे म्हटले जाते. ह्या शहराला जुन्या काळात पानेली ह्या नावानेदेखील ओळखले जायचे. या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका होती. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० – १९१६ मध्ये युसुफ नुर मोहम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडून आले.१ ऑक्टोबर २०१६ रोजी पनवेल नगर परिषदेचे रूपांतर महानगर पालिकेत झाले.तेव्हापासून डॉ कविता चौतमोल पनवेल च्या महापौर आहेत.पनवेल महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पनवेल येथील बाजारपेठेत मिरचीचा व्यापार करण्यासाठी येत.त्याठिकाणी त्यांचे कारेरकर यांनी बनविलेले शिल्प त्यांची आठवण म्हणून ठेवले आहे.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवास करताना पनवेलच्या सुभेदार वाड्यातील भातनकर यांचे घरी थोडा वेळ थांबून विश्रांती घेत असत.प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म पनवेल चा, ते विरुपाक्ष मंदिराचे पाठी राहत असत.आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जाज्वल्य पूर्ण इतिहासाची मुहूर्तमेढ याच तालुक्यातील शिरढोण येथून झाली.आजही या गावात त्यांचा जन्म झाला तो वाडा ऐतिहासिक वारसा म्हणून जपून ठेवला आहे.हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे ऊर्फ हिरवे गुरुजी हे सुद्धा पनवेलचेच,गोवा मुक्ती संग्रामात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या या स्वातंत्र्य सेनानीला हौतात्म्य पत्करावे लागले.विनायकराव मोरेश्वर गोविलकर,वसंत महादेव वेदक,चापसी पुरुषोत्तम रेवासीया,आत्माराम महादेव आटवणे,केशव गणेश ऊर्फ दादाभाई गुप्ते,मुरारजी पुरुषोत्तम करवा,रामकृष्ण विश्वनाथ आपटे,त्रिंबक नारायण बेडेकर,पुरुषोत्तम गोपाळकृष्ण बापट,रामकृष्ण गणेश आपटे,दत्तात्रेय श्रीधर कारूळकर,शंकर चिंतामण ऊर्फ बापूसाहेब खरे,मारुती मुकुंद पन्हाळे,चंदुलाल परशुराम लाहोटी,अजगर इब्राहिम शेख (तलोजा),देवराम नारायण काठे,रामचंद्र बाळा हाडगे,श्रीमती मधुबाई गांगल,शिवराम कांदेगोविंद काशिनाथ पटवर्धन हरी विष्णू भाटे,शंकर नारायण पांडव,नारायण धोंडू खरेदलिचंद,लालचंद कोठारी,किसन एकनाथ जगनाडे,प्रभाकर केशव गुप्ते यांसारख्या अनेक प्रभूतींनी पदरमोड करून या तालुक्याला वलय प्राप्त करून दिले.

वसई वरील मोहिमेवरून बाजीराव पेशवे यांचे सैन्य पुण्याकडे परत जात असता पनवेल वेशीवर थांबले,सैन्य भुकेले होते.सेनापती असणाऱ्या चिमाजी आप्पा ने पनवेलच्या नगरशेठ लोकांशी चर्चा केली,त्यावेळी बापट यांनी त्यांचा खजिना खुला करून दिला.सैन्य सुखावले. त्याबदल्यात सैन्याने श्री बल्लाळेश्वराचे समोर तलाव खोदून दिला.तोच ऐतिहासिक वडाळे तलाव.त्याच प्रमाणे पनवेल मध्ये इश्राळे,कृष्णाळे सारखे डझन भर तलाव होते,आता त्यातील अवघे चार शिल्लक आहेत.

भाताचे कोठार, मिठ साठवणीचे बंदर आणि बैलगाडीच्या चाकांची निर्मिती करणारे म्हणून पनवेल प्रसिद्ध होते.दादासाहेब पुराणिक यांच्या धुतपापेश्वर करखान्याने पनवेल ला देशात ओळख निर्माण करून दिली.पनवेल तालुक्यात सध्या तळोजे आणि रसायनी असे दोन मोठे औद्योगिक पट्टे आहेत.एच आय एल,सिपला, दिपक फर्टिलायझर्स, भेल इंडिया,आय जी पी एल अशा मोठ्या कंपन्यांमुळे रोजगाराची भूक भागते.परंतु रिलायन्स च्या गुजरातमध्ये जाण्याने आणि एच ओ सी मधील कारभार बंद पडल्याने अनेकांसमोर भ्रांत आहे.पनवेल व जवाहर इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये स्मॉल आणि मीडियम स्केल चे व्यवसाय असून येथे देखील चांगले रोजगार निर्माण होतात.

पनवेल तालुक्यांत अजिवली,अरिवली, आकुर्ली,आकुळवाडी,आडिवली (किरवली),आदई,आपटे (पनवेल), आंबिवली (पनवेल)आंबे (पनवेल)आष्टे (पनवेल),आसुडगाव,उमरोली,उलवे,ऊसर्ली खुर्द,ऊसर्ली बुद्रुक,ओवळे (पनवेल), ओवे,करंजाडे,करंबेली,करवले बुद्रुक,कराडे खुर्द,कराडे बुद्रुक,कर्नाळा (पनवेल), कल्हे, कळंबोली,कळसखंड,कानपोली,कामो,कालीवली,कासप,कासारभाट,काळुंद्रे,कुडावे,कुडेवहाळ,केवाळे,केळवणे,कोंडप,कोंडले,कोन (पनवेल),कोपर (पनवेल),कोपरोली, कोयनावेळे,कोरळ,कोळखे,गव्हाण,गाढे,गिरवल,गुळसुंदे,खानाव,खानावळे,खारकोंपर,खारघर,खेरणे खु्र्द,खैरवाडी,घोट, चावणे, चाळ,चिखले (पनवेल),चिंचवण,चिंचवली (पनवेल),चिंध्रण,चिपळे,चिरवत,चेरवली, जावळे (पनवेल),जाताडे,जांभिवली, टेंभाडे,डेरवली,डोलघर,तरघर,तळोजे,तळोजा,तामसई (पनवेल),तुरमाळे,तुराडे, तुर्भे, दहिवली (पनवेल),दापीवली,दापोली (पनवेल),दिघाटी,दुंदरे,देवद,देवळोली बुद्रुक,देवीचा पाडा,देहरंग,धाकटा खांदा,धानसर,धामणी (पनवेल),धोधाणी, नागझरी (पनवेल),नांदगाव (पनवेल), नानोशी, नारपोली,नावडे, नितळस,नितोळे, नेरे (पनवेल),नेवाळी,न्हावे (पनवेल),पडघे, पळस्पे,पाटनोली,पाडेघर,पारगाव (पनवेल),पारगाव डुंगी,पाले बुद्रुक,पाले खुर्द,पाली देवद,पाली बुद्रुक (पनवेल),पाली खुर्द (पनवेल) पिसार्वे,पेंधर,पोयंजे, पोसरी, बारवाई,बामनडोंगरी,बारापाडा,बीड (पनवेल),बेलवली (पनवेल),बोनशेत,बोर्ले (पनवेल),भाताण,भिंगार(पनवेल),भिंगारवाडी,भेरले,भोकरपाडा,महालुंगी (पनवेल), महोदर (पनवेल),माचीप्रबळ, मानघर, मालडुंगे,मोठा खांदा,मोर्बे, मोसारे,मोहपे, मोहो,रिटघर,रोडपाली,रोहिंजण,लाडीवली,लोणीवली,वडघर (पनवेल),वडवली (पनवेल),वलप,वळवली,वहाळ,वाकडी (पनवेल),वाघीवली,वाजापूर,वाजे,वारदोली,वावंजे,वावेघर (पनवेल),विचुंबें, विहीघर, शिरढोण,शिरवली (पनवेल),शिलोत्तर रायचूर,शिवकर,शिवणसई (पनवेल) शेंडुग,सवणे,साई (पनवेल),सांगडे, सांगटोली,सांगुर्ली,सारसई,सावळे,सोनखार,सोमटणे,हरिग्राम,हेदुटणे,मुरर्बी,कोलवाडी
ही गावे आहेत.

तालुक्यात शेती मध्ये भाताचे उत्पन्न सर्वाधिक घेतले जाते,त्यानंतर भाजीचे मळे लावले जातात.होळीचे आसपास वालाच्या शेंगा घेतल्या जातात.त्यांच्या जोडीला हरभरा, चौळी ही कडधान्ये देखील शेतकरी घेतात.पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध आहे.सहकारी भात गिरणी चे माध्यमातून भात पिकाला हमीभाव मिळतो, लाभार्थींना थेट खात्यावर लाभ दिला जातो.सध्या सहकारी भात गिरणी चे चेअर मन मनोहर पाटील असून,कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन डॉ दत्तात्रय पाटील आहेत.भात खरेदी आणि लाभार्थींना लाभ देण्यात रायगड जिल्ह्यात पनवेल केंद्र अव्वल आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.