Press "Enter" to skip to content

शारदीय नवरात्र
पहिली माळ

शारदीय नवरात्र
पहिली माळ

आज नवरात्रीची पहिली माळ! आदिशक्ति, आदिमायेची विविध नावांनी, विविध रूपांनी पूजा करण्याचा हा उत्सव. ती साक्षात जगदात्री, ती सरस्वती. ती म्हणजे ऊर्जेचा अखंड स्त्रोत. ती सर्व जगताची आई. वेद जिचे वर्णन करायला थिटे पडले,
अनेकानेक प्रतिभावंतांनी जिची स्तवने रचली,अशा त्या आईची माझ्या अल्प-स्वल्प मतीने शब्दपूजा बांधण्याचा हा छोटासा प्रयत्न करत आहे.
आजचं मनात वसलेलं देवीचं रूप आहे “लेक”.
लेक येतेच मुळी लक्ष्मीच्या पावलांनी. तिच्या नुसत्या येण्याने घर-दार आनंदाने मोहरून जातं. घरातील चर-अचर वस्तूंवर तिची जादूची कांडी फिरु लागते आणि ही छोटीशी परी सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनून जाते. तिचं बाळरुप इतकं गोड असतं की, उचलून घेतल्यावर खाली ठेववत नाही . तिच्या बाळलीला, तिचं दुडक्या पावलांनी घरभर धावणं, तिचं बोबडं पण लाघवी बोलणं, नुसतं घरच नाही, शेजार-पाजारही तिच्यावर लुब्ध होऊन जातं. ती हट्ट करते, लाड पुरवून घेते. सारं घर तिच्या कौतुकात न्हाऊन जातं.
हळूहळू लेक मोठी होऊ लागते, पाकळ्या – पाकळ्यांनी उमलत कळी फुलू लागते. आता ती आईची मैत्रीण होऊ लागते आणि बाबांच्या डोळ्यातील बाहुली. कितीही धीरोदात्त पुरूष असला तरी लेकीसाठी तो हळवा होऊ लागतो. आज ना उद्या तिची पाठवणी करावी लागणार म्हणून कासावीस होतो. पण, लेक कसली? ती तर सासरी गेली तरी माहेर तिच्या मनात घेऊन जाते. सासरचं सगळं निभावताना माहेरचीही कर्तव्य लीलया पेलत रहाते.
आई-बाबांची मान आता लेकीच्या अभिमानाने ताठ होऊन जाते. दोन घराण्यांना उजळणारी त्यांची छोटीशी परी त्यांचा आधार होते. आणि तरीही ती मनातून तिचं शैशव जपून ठेवते. आजही ती बाबांच्या गळ्यात पडून लहानपणीसारखा खाऊचा हट्ट करते. तिच्याकडे कितीही किंमती साड्या असल्या तरी आईच्या जुन्या साडीसाठी अडून बसते.अशी लेक आपल्या पोटी यावी असं कोणाला वाटणार नाही?
अशी ही मुग्धा, जिच्यावर संपूर्ण जग मुग्ध होतं, ती देवीचंच रूप हे नक्की.

सौ. पौर्णिमा दीक्षित
सेक्टर १५-ए,नवीन पनवेल
98205 85625

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.