प्रतिकूल परिस्थितीचे चटके सहन करून सुखद क्षणाचा गारवा देणारा ओअॅसिस म्हणजे श्रीमान प्रतिक जुईकर….. श्री.मच्छिंद्रनाथ काशिनाथ म्हात्रे, वशेणी
असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात…हेच विधान प्रतिकच्या बाबतीत १००% शोभून दिसले. इयत्ता दुसरीत असतानाच प्रतिकच्या बुध्दीमत्तेची चुणूक दिसू लागली ती म्हणजे आकलन करून धडाधड वाचणे पुढे याच वाचनाच्या जोरावर आय ए एस पर्यत मजल मारणारा यंगस्टार प्रतिक जुईकर हा अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा या गावातील.
वडील चंद्रशेखर जुईकर प्राथमिक शिक्षक आणि आई वनिता गृहिणी.दोन मुलगे,एक तेजस आणि दुसरा प्रतिक. दोघांच्याही नावात विजयाची यशोगाथा तेजस हा प्रतिकचा छोटा भाऊ,आज रोजी तो इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून पनवेल पळस्पे येथे मॅराथॉन टाॅवर संकुलात नोकरी करत आहे.
साधारण १९८५ ते २००० चा काळ म्हणजे शिक्षकाचा तुटपुंजा पगार आणि तारेवरची कसरत म्हणजे घर संसार. वडील कर्जत तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला असल्याने प्रतिकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कर्जत येथे झाले. १९९२ साली ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजनेखाली शाळांना सुगीचे दिवस आले.एक शिक्षकी शाळा व्दिशिक्षकी झाल्या.आणि शाळेत खडू फळ्या सोबत अनेक वाचनीय पुस्तके देखील आली. याच संधीचा फायदा घेत चंद्रशेखर जुईकर यांनी आपल्या मुलापुढे हवे तेवढे वाचन खाद्य पुढ्यात ठेवले. प्रतिक देखील या वाचन खाद्यावर आनंदाने तुटून पडायचा. इयत्ता ४ थी पूर्ण झाल्या नंतर मे महिन्याच्या सुट्टीत तर अनेक पुस्तके प्रतिकने वाचून काढली आणि खास करून याच काळात प्रतिकने कादंबरी वाचनास सुरूवात केली.
शिष्य वृत्ती परीक्षा , निबंध वक्तृत्व स्पर्धा आदि उपक्रमात प्रतिकची चुनुक दिसायला लागली. आणि इथूनच प्रतिकच्या आई वडिलांच्या, जवळच्या नातेवाईकांच्या मनात आपल्या मुलाने एम पी एस सी , यु पी एस सी मध्ये करिअर घडवावे, त्याने लाल गाडी फिरवावी.अशी स्वप्ने दिसू लागली.
प्रतिकने अभिनव विद्यामंदिर कर्जत येथून इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८५% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
१२ वीला देखील हीच परंपरा जपली.
एकदा का १०वी/१२वी झाली..की मुलांच्या करिअर वाटा सुरू होतात. मग पुढे काय….? हा प्रश्न प्रत्येक पालकाला सतावत असतो .असाच प्रश्न प्रतिक आणि प्रतिकच्या वडिलांसमोर होता…..
मार्ग अनेक समोर उभे होते.परंतु आर्थिक भार कितपत सहन होईल याचा विचार करून मध्यप्रदेश इंदोर विद्यालयात आय. आय. टी साठी प्रवेश घेण्याचे नक्की झाले.
शिकण्याची जिद्द ,काटकसर, स्वावलंबन, वाचनाची गोडी आणि नाते वाईक, आप्तेष्ट यांची प्रेमळ माया या शिदोरीवर आय आय टी सिल्व्हर मेडलने पूर्ण केली.
कसल्याही हौशी,उच्च गोष्टीची मागणी नकरता मिळेल त्या स्त्रोतातून ज्ञान मिळवणे हीच खरी प्रतिक ची खुमाशी
स्वतःच्या परिस्थितीची ज्याला ज्याला जाणिव होते तो माणूस कधीच हवेत उडत नाही. प्रतिक ही असाच आहे..हवेत न उडणारा. म्हणूनतर दहावी बारावीला जी बक्षीस रक्कम मिळाली होती ती रक्कम वाह्यात खर्च नकरता त्या रकमेतून प्रतिकने स्वतःसाठी एक मोबाईल व संगणक घेतला. पण मोबाईल च्या जादुई दुनियेत न अडकता मोबाईल आणि टिव्ही पासून जितके लांब राहता येईल तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न केला.
ग्रंथालय आणि मित्रांकडील पुस्तके वाचणे, मोबाईलवर फोटो पाडून ते फोटो संगणकावर अपलोड करून ते झूम करून वाचणे हे आता नित्याचेच बनू लागले. कुठल्याही गोष्टी साठी हट्ट करणे हे विधान प्रतिकच्या जीवनात आजतागायत आले नसावे.म्हणून मोठ मोठ्या पुस्तकांसाठी त्याने कधीच हट्ट केला नाही.
आय आय टी नंतर पुढे परदेशात शिकायला जावे, नोकरीला जावे असा विचार प्रतिकच्या मनात आला होता. सोबतच्या ब-याचशा मित्रांनी परदेश गाठले देखील होते.
प्रतिकने आपला विचार आई वडिलांसमोर ठेवला देखील.
आर्थिक परिस्थिती आता ब-या पैकी होती. परंतु आपल्या देशाची बुध्दीमत्ता आपल्याच देशाला उपयोगी आली तर आपला देश समृध्द होण्यास नक्कीच हात भार लागेल या वडिलांच्या इच्छा शक्तीमुळे परदेशात जाण्याचा मनसुबा थांबला गेला.
पण नाउमेद होईल तो प्रतिक कसला..?, आई वडीलांचा मान राखत त्याने निर्णय बदलला. शिक्षणाचे माहेरघर असणा-या पुण्यात दोन वर्ष टाटा मोटर्स मध्ये नोकरी पत्करली. नोकरीच्या आलेल्या पगारात कर्जत येथील ब्लाॅक सजवला आणि स्वतःसाठी एक टुव्हिलर खरेदी केली. या टुव्हीलर वरून येताना आई वडिलांना आपला मुलगा लाल दिव्याच्या गाडीतूनच येतो असा भास होत होता..
पुढे हाच भास प्रतिकचा ध्यास बनला आणि आपणास ठाऊक सुध्दा आहे ज्यांच्या मनात उत्तुंग ध्येय असतात त्यांना हिमालयाची शिखरे देखील छोटी छोटी वाटतात मनात बाळगलेल्या लाल दिव्याच्या स्वप्नासाठी प्रतिकने नोकरीला रामराम ठोकून यु पी एस सी चा अभ्यास सुरू केला.पहिले वर्ष अयशस्वी, दुस-या वर्षी तर दोन मार्कानी गाडी हुकली. पण प्रतिकची उम्मीद पे दुनिया कायम होती एक दोन नाही तब्बल तीन वर्षाच्या खडतर प्रवासा नंतर तो सोन्याचा दिवस उजाडला. रायगडाला जाग आली. अलिबागच्या प्रतिकने कर्जतच्या पावन भूमीत यशाची विजय पताका फडकवली. प्रतिकूल परिस्थितीचे चटके सहन करून सुखद क्षणाचा गारवा देणारा आगरी समाजातील ओअॅसिस श्रीमान प्रतिक जुईकर आय ए एस झाला !!
माज नाही ,उन्माद नाही, प्रेमळ स्वभाव, प्रतिकूल परिस्थितीत ज्या नातेवाईकांनी मदत केली ती जाणीव आणि हसतमुख चेहरा असणारा हा २७ वर्षीय यंगस्टार प्रतिक जुईकर
देश सेवा करण्यासाठी सज्ज झाला…
जसा मी आय ए एस झालो त्याप्रमाणे इतर तरूणांनी देखील या क्षेत्राकडे वळावे .त्या साठी सदैव मार्गदर्शन करण्याची दाट इच्छा प्रतिकच्या मनात आहे. मानव समाजातील युवा युवतींनी त्याच्या कडून नक्कीच प्रेरणा घ्यावी .
प्रतिकच्या या प्रवासासाठी अनंत शुभेच्छा !!!
Be First to Comment