सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
समर्थांच्या समर्थ संदेशाचा आधार घेऊन समर्थांचे अनमोल विचार सर्व दूरवर तळागाळातील समाजापर्यंत पोहोचावेत ,समर्थांचे प्रत्यक्ष स्वरूप असणाऱ्या श्रीमद दासबोध ,मनोबोध, आत्माराम आणि समर्थांच्या समग्र वाड्मयाचा प्रचार, प्रसार समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी हे देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सत्संगाच्या माध्यमातून करीत आहेत.
दि.१ ऑक्टोबर रोजी परमपूज्य मोहनबुवा रामदासी आपल्या मित्र परिवारासह माथेरान मध्ये आले होते. यावेळी त्यांनी इथल्या मित्र मंडळींसोबत श्रीराम मंदिरात सायंकाळी पाच वाजता सत्संगाचे आयोजन केले होते.महिला वर्गाने त्यांचे औक्षण करून दासबोधातील श्री मनाचे श्लोक कथन केले त्यानंतर मंदिरात सत्संगाची सुरुवात करण्यात आली त्यास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
देव, देश आणि धर्माची शिकवण देणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रथम समाज मनाचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा व्यापक विचार मनात ठेऊन रामकथा ब्रम्हांड भेदून पैलाड नेण्याचे स्वप्न समर्थांनी त्याकाळात समाजासमोर ठेवले होते. आज लोक कोरोना काळात सुध्दा सुखरूप आहेत. मानवी मूल्ये जोपासताना जीवनातील चढउतार मार्गक्रमण करताना कर्मे चोख असायला हवीत तर मानवाला मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचे सार्थक करणे आपल्या हातात आहे. आजच्या युगात अध्यात्म करणे कुणालाही शक्य होत नाही जो तो नाशिवंत वस्तूंचा साठा करण्यात मग्न आहे परंतु जे शाश्वत आहे जे आपल्या सोबत कायमस्वरूपी राहणार आहे त्याचा स्वीकार सहसा कुणी करत नाहीत. क्षणिक आनंद उपभोगण्यासाठी मनुष्याची धावपळ सुरू आहे परंतु ज्या परमार्थातून मनाला समाधान कशाप्रकारे प्राप्त होईल याचा विचार सुध्दा कुणी करत नाहीत. असे परमपूज्य मोहनबुवा रामदासी यांनी सत्संगातुन अनमोल विचार कथन केले तर मनाचे श्लोक आणि श्रीरामाचे भजन आपल्या मधुर आवाजात सादर केले.
यावेळी त्यांना हार्मोनियमची साथ उमेश ढेबे यांनी तर तबला वादक प्रमोद मोरे यांनी उत्तम प्रकारे साथ दिली. विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष हरिभाई मेहता, कोकण वासीय समाज अध्यक्ष शैलेंद्र दळवी, जनार्दन पार्टे, भालचंद्र दळवी,नगरसेवक चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक प्रदीप घावरे,महिला आघाडीच्या सुहासिनी शिंदे,जयश्री रेनोसे,कांचन केतकर, बिना कदम यासंह अन्य उपस्थित होते.
Be First to Comment