Press "Enter" to skip to content

औषध देण्यासोबतच फार्मासिस्ट वाचविणार रुग्णांचे प्राण !

जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील फार्मसिस्टना सीपीआरचे प्रशिक्षण !!

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

आता कोरोनाची लाट ओसरू लागली आहे परंतु तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आजही आपल्या डोक्यावर असून नियमित व्यवहार सुरु झाले आहेत. कोरोनाची पहिली व दुसरी लाट आठवली की अंगावर शहारे येतात. या कठीण काळामध्ये अनेक कोरोना योद्धा आपल्या प्राणांची बाजी लावून नागरिकाना सुविधा देत होते.

डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय , हॉस्पिटलमधील साहाय्यक कर्मचारी, पोलीस, महानगरपालिकेतील कर्मचारी, बँकांचे कर्मचारी मोठ्या हिमतीने आपले कर्तव्य पार पाडत होते यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ” फार्मासिस्ट” हा घटक सुद्धा कोरोनाच्या महामारीत मुख्य भूमिकेत होता. नुकताच जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा झाला व त्या निमित्ताने सानपाडा येथील केमिस्ट भवनात नवी मुंबई रिटेल केमिस्ट व होलसेलर असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली तसेच नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या व भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ फार्मासी यांच्या सहकार्याने नवी मुंबईतील फार्मासिस्टचा गौरव केला असून त्याना सीपीआरचे ट्रेनिंग देण्यात आले.

आजारी पडल्यावर आपण नेहमीच फार्मासिस्टची मदत घेऊन प्राथमिक उपचार करतो. रुग्णांना समुपदेशन करणे तसेच त्याना औषधांची योग्य माहिती देण्यासोबतच आता ते हृदयविकार झालेल्या नागरिकांचे प्राण वाचवू शकतील असा विश्वास तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे व्यक्त करण्यात आला.

यावेळी शंभरहून अधिक फार्मसिस्ट तसेच फार्मसीचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. हृदयविकारानंतर जगभरात जास्त मृत्यू पहिल्या एक दोन तासांत योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने होतात. त्यात चुकीचा सल्ला देणारे शेजारी असतात. हृदयविकाराचा झटका आल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणे व त्या दरम्यान प्रथमोपचार मिळणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते.

त्यामुळे ४० टक्के पेशंटचे प्राण वाचू शकतात.काही वेळा कार्डिओपल्मनरी रेसस्किटेशनसारखे (सीपीआर) उपचार आणि ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफायब्रिलेटर यांची आवश्यकता भासते. आपत्कालीन परिस्थितीत जसे की हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्ट, सीपीआर पद्धतीला संजीवनी समजले जाते. हृदयविकार, गुदमरणे, बुडणे, विद्युत शॉक इत्यादीमुळे कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. सीपीआर प्रक्रियेत तोंडाने श्वास देणे आणि छातीच्या दाबांचे संयोजन आवश्यक असते.

रुग्ण वाचण्याची शक्यता वाढवण्यासाठी या प्रक्रियेचे तसेच साधने वापरण्याचे पूर्ण ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. तसेच यातील अचूकता साधण्यासाठी हे प्रशिक्षण दर सहा महिन्यांनी घ्यावे लागते अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर तर्फे देण्यात आले. तेरणा हॉस्पिटलतर्फे अतिदक्षता विभागातील डॉ विपुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रबरी मानवी पुतळ्याच्या मदतीने उपस्थित फार्मासिस्टना सीपीआरचे ट्रेनिंग देण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.