सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
लसीकरणाचे महत्व समजल्यावर विशेषतः कर्जत उप जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. कोविड लसीची उपलब्धता कमी आणि लस घेणारांची संख्या जास्त असल्याने अनेकांना परत जावे लागत असे. आता यामध्ये नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागांमध्ये लसीकरण शिबीरांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील नानामास्तर नगरमध्ये आयोजित केलेल्या लसीकरण शिबिरात 377 जणांनी लस घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नगरसेविका भारती पालकर आणि डॉ. ज्योती मेंगाळ यांनी नानामास्तर नगर मध्ये शिबिराचे आयोजन केले होते. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका संगीता खराटे, आरोग्य सेवक सुनील कांबळे यांनी लस देण्याचे काम केले.
यावेळी माजी नगरसेवक गुरुनाथ पालकर,भानुदास पालकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष सोमनाथ पालकर, संदेश मोरे, प्रितेश बोंबे, विलास दिघे आदींनी सहकार्य केले. पहिला डोस 267 जणांनी तर दुसरा डोस 110 जणांनी असे 377 जणांचे लसीकरण करण्यात आले.
Be First to Comment