Press "Enter" to skip to content

चायनीज गाडयांवर सडलेल्या चिकनची सर्रासपणे विक्री ; अन्न व औषध व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

उरणमध्ये चायनीज खाऊन ७ जणांना विषबाधा ; ६ लहान मुलांचा समावेश

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण शहरातील रस्त्यावरील चायनीज गाडीवरील खाद्यपदार्थ खाऊन ७ जणांना विषबाधा झाली आहे. त्यामध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उरण शहरात व तालुक्यात अनेक चायनीजच्या गाडयांवर बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थांची सर्रासपणे विक्री केली जाते. अशा बेकायदेशीर चायनीज गाड्यांना उरण नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी वर्ग आर्थिक हितसबंधातून संरक्षण देत असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे. तरी अशा बेकायदेशीर सुरू असलेल्या चायनीज गाड्या त्वरीत बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

उरण शहरातील एनआय हायस्कुल जवळील भर रस्त्यावर बेकायदेशीर सुरू असलेल्या दीपक रमेश दळी व अर्जुन सच्छिद्रनाथ गोष यांच्या मालकीच्या संजू चायनीजवर काल बुधवार दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार सुजीत गोपीनाथ पाटील यांनी ५ हाफ चिकन फ्राय राईस घेऊन घरी गेले होते. त्यावेळी हे चिकन फ्राय राईस खाल्यानंतर काही अवधीतच सुजल, रिता सत्येंद्र ठाकूर(३८), सिद्धार्थ सत्येंद्र ठाकूर(११), अर्णव भरत पाटील(९), सिया निलकमल थळी(९), सानिया सुनिल म्हात्रे(१५), आर्या सुनील म्हात्रे (४) यांना उलट्या व पोटाचा त्रास जाणवू लागला. त्यांना त्वरित इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावरील धोका टळला आहे.

या प्रकरणाचा उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चायनीज विक्रेते दीपक दळी व अर्जुन गोष याच्यावर भादवी १८६० नुसार कलम २०३, ३३६ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. याचा तपास हेड कॉन्स्टेबल विजय पवार हे करीत आहेत.

उरण शहरात व तालुका मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चायनीज गाडयांवर चिकनच्या पदार्थांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. यांना कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. बहुतांश चायनीज गाड्यांवर सडलेला वापरून जनतेच्या जीवाशी चायनीज विक्रेते खेळत आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासन, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष माळी, व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी व वृत्त प्रसिद्ध करूनही त्यांच्याकडून अशा बेकायदेशीर चायनीज विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसत नाही. याचाच अर्थ या सर्व अधिकारी वर्गाचे आर्थिक हितसंबध जपले जात असल्यानेच ते कारवाई करीत नसल्याचे उरणच्या नाक्यांनाक्यावर याची चर्चा सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.