
पनवेल / प्रतिनिधी
लोकशाहीचा गळा घोटत आणि नोकरशाहीचा माज दाखवत पनवेल महानगरपालिकेच्या तत्कालीन आणि विद्यमान अधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाला खोडसाळपणे परवानगी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला कायदा आणि नियमांचे बोट दाखवायचे आणि दुसरीकडे त्याच वडाळे तलावावर बेकायदेशीरपणे रंगणाऱ्या खाजगी ‘महिला फॅशन शो’ला मूकसंमती द्यायची, असा पक्षपाती आणि दलित-बहुजन समाजविरोधी कारभार पनवेल पालिकेत सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश सोनावणे यांनी केला आहे .
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस ,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ,पोलीस आयुक्त नवी मुंबई ,विभागीय कोकण आयुक्त यांच्याकडे सोनावणे यांनी तक्रार करण्यात आली आहे.याप्रकरणी पनवेल महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त मारुती गायकवाड,विद्यमान जबाबदार अधिकारी आणि परवाना विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम (Atrocities Act) आणि भारतीय न्याय संहिते (BNS) अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ‘जागृती फाउंडेशन’चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केली आहे.
२३ मार्च २०२२ रोजी पनवेल महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत (ठराव क्र. ४४२) तत्कालीन सभागृह नेते परेश ठाकूर व महापौर कविता चौतमोल यांच्या कार्यकाळात ऐतिहासिक ‘वडाळे तलाव’ परिसरात राजकीय कार्यक्रम वगळता सर्व खाजगी, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली होती.
परंतु, नगरसेवकांची मुदत संपताच प्रशासकीय हुकूमशाही गाजवत तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी लोकप्रतिनिधींचा मूळ ठराव बाजूला सारला. स्वतःच्या अधिकारात एक नवीन प्रशासकीय ठराव (क्र. ६७९) मंजूर करून महापुरुषांचे विचार आणि जयंती कार्यक्रम रोखण्यासाठी चक्रव्यूह रचला, असा थेट आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
‘जागृती फाउंडेशन’च्या वतीने २१ मार्च २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी वडाळे तलाव येथे परवानगी मागितली होती. मात्र, तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या इशाऱ्यावरून परवाना विभागाने “या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येतात, गर्दी असते,” असे अत्यंत उथळ, हास्यास्पद आणि खोडसाळ कारण देत परवानगी नाकारली. उपायुक्त मारुती गायकवाड यांनी सोनावणे याना लेखी पत्र देऊन दलित व बहुजन समाजाला सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यापासून रोखण्याचा कुहेतू साध्य केला.ज्या वडाळे तलावावर महापुरुषांच्या जयंतीला नियमांचे डोस पाजले गेले, त्याच ठिकाणी १७ मे २०२६ रोजी एका खाजगी संस्थेने व्यावसायिक व मनोरंजनात्मक ‘महिला फॅशन शो’ चे जाहीर आयोजन केले होते. या फॅशन शोला कोणतीही अधिकृत परवानगी नसताना , पनवेल महानगर पालिका आयुक्त यांनी व पनवेल पालिकेच्या परवाना विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट, डोळ्यांवर पट्टी बांधून ‘बघ्याची भूमिका’ घेतली. महापुरुषांच्या विचारांपेक्षा पालिकेला फॅशन शो महत्वाचा वाटला का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
या निंदनीय प्रकाराबाबत निलेश सोनावणे यांनी अधिकाऱ्यांनी दोन समाजात जातीय-धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या संबंधीत अधिकाऱ्यांवर अनुसूचित जातीच्या विरुद्ध द्वेष किंवा प्रतिकूलतेची भावना पसरवणे,सार्वजनिक ठिकाणी अनुसूचित जातीच्या समाजाचा जाणीवपूर्वक अपमान करणे अशी कृत्य केल्याने अॅट्रॉसिटी कायदा कलम ३(१)(u) कलम ३(१)(r) व ३(१)(s)
भारतीय न्याय संहिता (BNS): शांतता भंग करणे आणि कट रचणे..कलम ४ नुसार
कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध कारवाई.कलमांनुसार FIR दाखल करण्याची मागणी केली आहे:
नोकरशाहीच्या या मनमानी जातीय तेढ निर्माण करण्याच्या पक्षपाती कारभारामुळे पनवेलमधील अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या धार्मिक आणि सामाजिक भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत. “महापुरुषांच्या जयंतीला खोडा घालणारे आणि फॅशन शोला रेड कार्पेट अंथरणारे हे अधिकारी नेमके कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होते?” असा सवाल सोनावणे यांनी उपस्थित केला आहे. शासनाने पोलिसांनी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश सोनावणे यांनी केली आहे .




Be First to Comment