
दोषींवर गुन्हे दाखल करा – आमदार विक्रांत पाटील
पनवेल : घोट येथील सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या ठिकाणी सुरू असलेल्या प्रदूषणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी आज प्रत्यक्ष डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच परिसरातील जल, मृदा आणि वायू प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने घाण पाण्याचा निचरा होऊन परिसरातील नागरिकांना विषबाधा व विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय डम्पिंग ग्राउंड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी, माती आणि हवेचे प्रदूषण होत असल्याचेही स्पष्ट झाले.
यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको, संबंधित ठेकेदार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीने घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या डम्पिंग ग्राउंडची मान्यता तात्काळ रद्द करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सिडकोच्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
घोट डम्पिंग ग्राउंड प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, परिसरातील माती, पाणी आणि हवेचे नमुने तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या चौकशीतून वस्तुस्थिती समोर येऊन नागरिकांना न्याय मिळेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी डम्पिंग ग्राउंडमधील कचरा वनजमिनीवरही टाकला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. वन विभागाने तातडीने पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पनवेल महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर कचरा या ठिकाणी येत असल्याने शहराबाहेर स्वतंत्र आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार विक्रांत पाटील म्हणाले, “नागरिकांच्या जीवापेक्षा कोणताही प्रकल्प मोठा असू शकत नाही. घोट परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा सामना करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि घोट येथील डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर स्थलांतरित होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील.”




Be First to Comment