सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यात काल अनंत चतुर्दशीच्या एकूण 1119 गणरायाना भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांनी नदी तसेच गावाजवळ असलेल्या तलाव व ओढ्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करीत बाप्पाला निरोप दिला. यंदाही गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक 8, खाजगी 423. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाजगी 663 आणि माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाजगी 25 अशा एकूण 1119 गणेशमूर्तींचे पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विसर्जन करण्यात आले.
काही विभागातील गणेशमूर्ती एकाच वेळी वाहनांतून उल्हास नदीच्या घाटावर आणून त्यांचे विसर्जन केले. दहिवली, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द, आकुर्ले गावातील भाविकांनी आपापल्या गणेश घाटांकर जाऊन गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले. गुंडगे आणि भिसेगाव येथील भाविकांनी कर्जत मधील गणेश घाटावर येऊन आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
विशेष म्हणजे कधी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी तर कधी दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येणाऱ्या कर्जत पोलीस ठाण्यात गणरायाचे विसर्जन आज सर्व सार्वजनिक गणरायांच्या आधी विसर्जन करून एक वेगळा पायंडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी सुरू केला. त्यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, संदीपान सोनवणे, सुनीता आथणे, राजेंद्र मांडे, प्रशांत देशमुख आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Be First to Comment