Press "Enter" to skip to content

रिटघर येथील गावाचा गणेशोत्सव म्हणजे एकोप्याचे आदर्श उदाहरण

पनवेल तालुक्यातील रिटघर गावामध्ये ४७ वर्षापासून एकच गणपती बसविण्याची परंपरा

सिटी बेल | पनवेल |

पनवेल तालुक्यातील रिटघर गावामध्ये ४७ वर्षापासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. रिटघर या गावात ४७ वर्षापासून एक गाव, एक गणपती बसविला जातो. त्यामुळे गावात सर्वजण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला तसेच गणेशाच्या सेवेला हजर होतात. २०१६ चा विघ्नहर्ता पुरस्कार देखील या रिटघरच्या राजाला मिळाला.

रिटघर येथे १९७५ मध्ये पहिल्यांदा एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडण्यात आली व त्याच वर्षापासून गावातील मंदिरात एक गणपती बसविण्यात आला. अनाठायी होणारा खर्च कमी व्हावा व आनंद प्राप्त व्हावा तसेच संपूर्ण गाव एकत्रित यावा यासाठी गावातील नागरिकांनी १९७५ मध्ये एक गाव एक गणपती ही प्रथा सुरु केला. गावातील हनुमान मंदिरात दरवर्षी गणेशाची मूर्ती बसविली जाते. या मंदिरात सर्व आबाल वृद्ध, ग्रामस्थ, लहान मोठे, महिला हजर असतात.

रिटघरचा राजा म्हणून प्रसिध्द असलेल्या या गणपतीच्या दर्शनासाठी अनेक जण बाप्पा समोर आपले गाऱ्हाणे मांडत असतात. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वाढत्या प्रतिसादातही एक गाव एक गणपतीही परंपरा रिटघर गावाने ४७ वर्ष अबाधित ठेवली आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते गणेशोत्सवासाठी मात्र गावाचा गणपती म्हणून एकत्र काम करतात.

या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक परंपरेच्या कार्यक्रमा अंतर्गत आरती, पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण अशा पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागात शक्यतो घरोघरी गणपती बसविण्याची प्रथा आहे. मात्र रिटघर गावाने एक गाव एक गणपती ठेवून समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गावातील ग्रामस्थ भजन, कीर्तन, आदीसह परंपरागत बाल्या नृत्याचे कार्यक्रम या ठिकाणी करत असतात.

सर्व ग्रामस्थ स्वखुशीने वर्गणी देऊन गणेशोत्सव साजरा करतात. गावातील प्रत्येकाला गणेशाच्या सेवेचा लाभ मिळावा म्हणून काही घरातील नागरिकांना गणपतीच्या सेवेसाठी नेमली जातात. महत्वाचे म्हणजे गावात या दिवशी जुगार खेळत नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पूर्वीच्या ग्रामस्थांनी सुरु केलेला हा एक गाव एक गणपतीची परंपरा पुढे सुरूच ठेवली आहे.

लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या सार्वजनिक गणेशोत्सव सोहोळ्याचा आनंद एक वेगळाच आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सोहोळा आनंदात पार पाडण्यासाठी संपूर्ण रिटघर गाव आनंदाने, एकजुटीने यात सहभागी होतो. घरोघरी गणेशोत्सव न साजरा करता या काळात ग्रामस्थांनी बसविलेल्या गणपतीची अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते. यामुळे गावकन्यांमध्ये एकोपा टिकून असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.