सिटी बेल | उरण | अजित पाटील |
उरणच्या पूर्व भागातील खोपटे पाटीलपाड्यातील 80 वर्षांची परंपरा असलेल्या शिवागौरा उत्सवात आज रक्तदान शिबिर घेण्यात आले . शिवकृपा गौरा मंडळाने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खोपटे गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. विशाखा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात 93 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे !
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवकृपा गौरा मंडळाने कोणतेही गर्दी होणारे कार्यक्रम न ठेवता या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून वैद्यकीय शिबीर घेतल्याने गौरा मंडळाचे परिसरात कौतुक केले जात आहे !!

उरणच्या पुर्व भागातील खोपटे गावात शिवागौरा उत्सवाची परंपरा शिवकृपा गौरा मंडळाने मागील 80 वर्षांपासून जपली आहे . गौरी आवाहनाच्या दिवशी दरवर्षी हा गौरा उत्सव सुरू होत असतो . या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी बाल्या नाचांचा कार्यक्रम होत असतो त्याला परिसरातील लाखो भक्तांची उपस्थिती लाभत असते . मात्र मागील वर्षी आणि या वर्षी देखील या सर्वच कार्यक्रमांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फाटा देण्यात आला असून मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात .

या सर्व पार्श्वभूमीवर आज गौरा उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर घेण्यात आले एम जी एम रुग्णालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला पंचक्रोशीतील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला , शिवकृपा गौरा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बांधपाडा खोपटे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. विशाखा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष , गौरा मंडळाचे पदाधिकारी , पाणी कमिटीचे पदाधिकारी आदी मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोरोनाचे सर्व निर्बंधांचा काटेकोर पालन करीत संध्याकाळ पर्यंत चाललेल्या या शिबिरात 93 जणांनी रक्तदान केले आहे.
सध्याच्या महामारीच्या काळात राबविलेल्या या वैद्यकीय उपक्रमाबद्दल सरपंच सौ. विशाखा प्रशांत ठाकूर यांनी शिवकृपा गौरा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कौतुक करून आभार मानले आहेत. यावेळी ग्रामपंचायतीचे अनेक सदस्य , ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी , गावातील विविध सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते आणि शिवकृपा गौरा मंडळाच्या पदाधिकारी मंडळींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली .








Be First to Comment