Press "Enter" to skip to content

सरनौबत नेताजी पालकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक टँबचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोरोनाच्या(Covid 19 ) प्रादुर्भावामुळे शाळा बंद पण शिक्षण सुरू असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत होते ही समस्या लक्षात घेऊन सिप्ला फाउंडेशन रसायनी पाताळगंगा व आय ड्रीम एज्युकेशन गुरुग्राम यांच्या माध्यमातून चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौकमधील इयत्ता दहावीच्या 179 विद्यार्थ्यांना व 10 शिक्षकांना शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली शाळेच्या संगीत विभागाच्यावतीने ईशस्तवन व स्वागतपद्य विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात सादर केले. या कार्यक्रमाच्या सन्माननीय प्रमुख अतिथी उल्का धुरी (सिप्ला फाउंडेशन सी .एस. आर. हेड) सिप्ला फाउंडेशनचे सुनील मकरे,ड्रीम एज्युकेशन गुरुग्रामचे सोमेश सर व सुरज गोंडगे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले.

देवानंद कांबळे सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भोमले सर यांनी केले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उल्का धुरी मॅडम यांनी आपल्या मनोगतात या टॅब मुळे विद्यार्थ्यांची नक्कीच उत्तम शैक्षणिक प्रगती होईल असा आशावाद व्यक्त केला.

विद्यार्थ्यांसाठी टॅबमध्ये खूप सोप्या सुलभ पद्धतीने अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आला आहे. या टॅबचा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामासाठीच वापर करावा असे त्यांनी सांगितले , सुनील मकरे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी टॅबची देखभाल कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.आय ड्रीम एज्युकेशन गुरुग्रामचे सोमेश सर व सुरज गोंडगे सर यांनी दोन दिवस विद्यार्थ्यांना टॅबच्या साह्याने अभ्यास कसा करावा याचे उत्तम प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सेक्रेटरी योगेन्द्र शहा यांनी सिप्ला फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.सिप्ला फाउंडेशन नेहमीच शाळेला भरभरून मदत करत असते याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला तसेच संस्थेचे उपकार्याध्यक्ष नरेंद्र शहा,संचालक कॅप्टन विठ्ठलराव कदम, संचालक सुलभा गायकवाड , संचालक नारायण आंबवणे सारंग शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पंडित पाटील, शाळेचे मुख्याध्यापक भोमले सर, उपमुख्याध्यापिका पुजारी, पर्यवेक्षक मोळीक सर उपस्थित होते.तसेच विद्यार्थ्यांसोबत पालक सुध्दा उपस्थित होते.त्यांनी सिप्ला कंपनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करुन आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कुंभार सर यांनी खुमासदार शैलीत केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.