मी लढवय्या… गवताचे भाले करून काॅंग्रेसला गतवैभव मिळवून देणार : महेंद्र घरत
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रायगड जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण मागील काही काळातील आपल्यातील मतभेदामुळे येथे काँग्रेस कमकुवत झाली आहे. आगामी काळात रायगडचा गड मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून जिल्ह्यात काँग्रेसला एक नंबरवर आणण्यात आपल्याला निश्चित यश मिळेल, असा विश्वास रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र घरत यांनी येथे व्यक्त केला.

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा पद्ग्रहन सोहळा व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत समाविष्ट करण्यात आलेल्या पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. ५ सप्टेंबर) अलिबागमधील बॅ. अंतुले भवन (काँग्रेस भुवन) येथे संपन्न झाला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महेंद्र घरत बोलत होते.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन सिद्धेश्वर कलावत, प्रदेश सचिव ऍड.प्रवीण ठाकूर, प्रदेश सदस्य ऍड. जे.टी. पाटील, प्रदेश कमिटी सदस्या नंदा म्हात्रे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड.श्रद्धा ठाकूर, प्रदेश पर्यावरण सेल अशोक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधली अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, मुरुड तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक, जिल्हा परिषद सदस्य बाजिराव परदेशी, विनोद ठाकूर, जिल्हा महिला संघटिका मोनिका पाटील, काका ठाकूर, राजेंद्र ठाकूर, ऍड.महेश ठाकूर, कविता ठाकूर, शुभांगी घरत, चंद्रकांत पाटील, मिलिंद पाडगावकर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी महेंद्र घरत यांनी प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन सिद्धेश्वर कलावत, प्रदेश सदस्य अऍड. जे.टी. पाटील यांच्या हस्ते रायगड जिल्हा अध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारली.

नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश सदस्य ऍड.जे.टी. पाटील, प्रदेश सचिव ऍड. प्रवीण ठाकूर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड. श्रद्धा ठाकूर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी रायगड जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा एकदा एक नंबरवर आणण्याचा विश्वास व्यक्त केला. एकेकाळी रायगड जिल्ह्यात सहा आमदार काँग्रेसचे होते. काँग्रेसने जिल्ह्यातून अनेक मंत्री दिले आहेत. पण आपल्यातील मतभेद, बेदिली तसेच अनेक जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली यामुळे येथील काँग्रेस कमकुवत झाली. हे मतभेद संपवून पुढील काळात सर्वांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे. शिबिरांच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले जाईल. गेली सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले हे सांगण्याची आज गरज आहे. रायगड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून पुन्हा एकदा हा गड मजबूत करण्याचा आपला प्रयत्न आहे. जेव्हा येथील काँग्रेस मजबूत होईल तेव्हा येथील संस्थानिकांची पळता भुई थोडी होईल असा इशाराही घरत यांनी दिला. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे आपण स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली पाहिजे असेही घरत यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले की,रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात मतभेद आहेत ते दूर करून त्यांना एकत्र आणून पक्ष मजबूत केला पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव हा काँग्रेसच्या काही फितूर कार्यकर्त्यांमुळे झाला आहे.अशी फितुरी ही बंद झाली पाहिजे.फितुरी बंद झाल्याशिवाय पक्ष वाढणार नाही.आजपासून दरवर्षी प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी पक्षाच्या वाढीसाठी जी कोण चांगला काम केले असेल त्या तालुक्याला एक इको रुग्णवाहिका,आणि एक लाखाचे पारितोषिक जाहीर केले आहे.पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ते यांच्या वाहनावर पक्षाचा चिन्ह असणे आवश्यक आहे तरी सदर चिन्हे लवकरच देण्यात येतील.

काँग्रेस पक्षाचे कार्य हे शेवटच्या नागरिकांमध्ये पोहचणे आवश्यक आहे.काँग्रेसने जे कमावले आहे ते मोदीनी विकायला काढला आहे.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली आहे.काही दिवसावर गणपती येणार आहेत तरी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले नाही. युवकाचा रोजगाराचा प्रश्न मोठा आहे तो सोडविला पाहिजे.काँग्रेस काळात जेंव्हा सिलेंडर, पेट्रोलचे भाव वाढले की विरोधक मोर्चा काढायचे आता त्याचे भाव गगनाला भिडत चालले आहे असेही घरत यांनी सांगितले.












Be First to Comment