Press "Enter" to skip to content

प्रासंगिक शिक्षकदिनाच्या निमित्ताने : विद्यार्थीप्रिय शिक्षक खाडे सर

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या वांगणी येथील माध्यमिक विद्यालयात गेल्या दोन दशकांपासून अगदी मन लावून ज्ञानदानाचे काम करणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणजे श्री. टिळक खाडे सर ! विज्ञान शाखेतील पदवी घेऊनही कोणत्याही कंपनीची वा इतर क्षेत्राची वाट न धरता अध्यापनाच्या आवडीपोटी खाडे सरांनी अगदी आनंदाने शिक्षण क्षेत्र निवडले आणि सरांनी निवडलेल्या क्षेत्रात भरीव कार्य केले .

वांगणीसारख्या ग्रामीण भागात विनाअनुदानित शाळेत काम सुरु करताना सरांना अनेक अडचणी आल्या . पण त्या अडचणींवर लिलया मात करुन खाडे सर केवळ वांगणी हायस्कूलच्याच विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये प्रिय झाले आहेत. गणित व विज्ञानासारखे काहिसे अवघड व क्लिष्ट विषय खाडे सरांच्या रंजक व सोप्या अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आवडू लागले. इतकेच नव्हे तर गेली अनेक वर्षे खाडे सर अध्यापन करत असलेल्या गणित व विज्ञान विषयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे . विज्ञान कोपरा , गणित कोपरा , गटचर्चा , क्षेत्रभेट आदी उपक्रमांतून गणित- विज्ञान विषयांचे अध्ययन – अध्यापन त्यांनी अधिक समृद्ध केले आहे. ‘ शिक्षक आपल्या दारी ‘ ह्या उपक्रमांतर्गत पालकांच्या गृहभेटी घेऊन विद्यार्थ्यांना येणा-या शैक्षणिक अडचणी ते जाणून घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ते कसोशीने प्रयत्न करीत आहेत. खाडे सर आजूबाजूच्या परिसरातील शाळांमध्ये जाऊन त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतात.

अभ्यासाबरोबरच सहशालेय उपक्रमातही शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढे असायला हवे याकडे खाडे सरांचा कटाक्ष असतो. खाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या ‘ आकाशगंगा ‘ ह्या प्रकल्पाची इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड झाली होती. करोना काळात प्रत्यक्ष शाळा बंद असताना ह्या कठीण परिस्थितीचा बाऊ न करता संकटाला संधी मानून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ शोधा , खेळा व शिका ‘ हा अभिनव वैज्ञानिक उपक्रम खाडे सरांनी राबवला . ह्या उपक्रमाअंतर्गत खाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दोन महिने विविध वैज्ञानिक प्रयोग केले. खाडे सरांनी राबवलेल्या या उपक्रमाची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने आपल्या विशेष वार्तापत्रात दखल घेऊन कौतुक केले.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्राने आयोजित केलेल्या ‘ विज्ञानदृष्टी ‘ कार्यक्रमात खाडे सरांनी यशस्वी सहभाग घेतला होता. केंद्र, तालुका तसेच जिल्हासतरीय सांस्कृतिक स्पर्धांचे त्यांनी उत्कृष्ट परीक्षण केले आहे. रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धांमध्ये त्यांनी सादर केलेल्या निबंधांना अनेकदा प्रथम क्रमांक मिळाला आहे.

पर्यावरण संवर्धन हा तर खाडे सरांच्या जिव्हाळ्याचा विषय!त्यासाठी विविध उपक्रम ते विद्यार्थ्यांकडून करुन घेतात. ह्या वर्षी होळीला होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी किंवा त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पर्यावरण रक्षणाचे फलक हातात घेऊन परिसरातील झाडांजवळ विद्यार्थ्यांना उभे केले व पर्यावरण संवर्धनाचा एक सकारात्मक संदेश जनमानसात दिला. गेल्या वर्षी राबवलेली ‘ रोप देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप ‘ ही अफलातून कल्पना देखील खाडे सरांचीच !

शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांकडे खाडे सरांचे विशेष लक्ष असते. कोणत्याही अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये ही खाडे सरांची तळमळ असते. याचाच एक भाग म्हणून समाजातील दानशूर व्यक्तींशी संपर्क करुन शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तके , गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत असतात.

शिक्षकाथसाठीच्या अनेक कार्यशाळांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून खाडे सरांनी जिल्हा तसेच राज्य स्तरावर अनेक वेळा अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. खाडे सरांच्या ज्ञानाचा फायदा परिसरातील विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून त्यांची गोवे – कोलाड येथील गीता द. तटकरे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाली आहे.

शैक्षणिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्याचीही खाडे सरांना प्रचंड आवड आहे. या तळमळीपोटीच खाडे सर दरवर्षी स्वतःच्या खर्चाने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करीत आहेत. याचा फायदा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. खाडे सरांनी स्थापन केलेल्या ‘ ऋणानुबंध सामाजिक संस्थे ‘ च्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी , व्यसनमुक्ती शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन,ग्रामस्वच्छता , वृक्षारोपण असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. मुलांच्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारली पाहिजेत या उदात्त हेतने त्यांनी गावागावात ‘ ग्रंथालय चळवळ ‘ सुरु केली आहे.खाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे माजी विद्यार्थी ऐतिहासिक गड – किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन करत आहेत.

आपल्या निर्भीड व निःपक्ष लेखणीतून अनेक शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांना खाडे सरांनी वाचा फोडली आहे. त्यासाठी ते विविध दैनिकांतून व नियतकालिकांतून सातत्याने लेखन करत आहेत. परीक्षापद्धती , ऑनलाईन शिक्षण, शाळाबाह्य मुलांचे प्रश्न, पूरग्रस्तांचे व वादळग्रस्तांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे व आदिवासींचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, टाळेबंदी, वेठबिगारी , पर्यावरणीय बदल , जलस्रोतांचे प्रदूषण , सामाजिक अभिसरण व परिवर्तन अशा अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

परोपकारी वृत्ती , विनम्र व प्रेमळ स्वभाव , अमोघ वक्तृत्व, विद्यार्थांप्रति असणारी कणव व तळमळ तसेच सतत नाविन्याचा शोध या गुणसमुच्चयामुळे खाडे सर सर्वांचे आवडते शिक्षक झाले आहेत. ज्ञानदानाचा हा नंदादीप अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी व निरपेक्ष भावनेने अंगिकारलेले समाजसेवेचे व्रत अविरतपणे सुरु ठेवण्यासाठी आदरणीय खाडे सरांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.