Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील करंजा गावात बंदी असलेल्या बायो डिझेलची खुलेआम विक्री

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या आदेशाला केराची टोपली

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना उरण करंजा गावात मच्छीमार बोटींना बंदी असलेल्या बायो डिझेलची खुलेआम स्वस्त दरात विक्री सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी जेएनपीटी परिसरात लाखों रुपयांचा बायो डिझेल पकडण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी करंजा गावात अशा प्रकारे बायो डिझेलची विक्री करणाऱ्यांवर नवी मुबंई पोलिसांनी कारवाई केली होती. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी बायो डिझेलची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देऊनही करंजा गावात दररोज ३ टँकर बायो डिझेलची विक्री होत असल्याची माहिती एका मच्छिमार नाखवांनी दिली. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही. यामध्ये प्रशासन व बायो डिझेलची विक्री करणारे यांचे आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा करंजा परिसरात सुरू आहे.

पेट्रोल डिझेलचे दर शंभरीच्या आसपास पोहचले असल्याने कमी दरात मिळणाऱ्या बायो डिझेलची विक्री करणारी टोळी उरण परिसरात कार्यरत आहे. दोन दिवसांपूर्वी जेएनपीटी परिसरात बायो डिझेलची विक्री सुरू असताना लाखो रुपयांचा बायो डिझेल जप्त करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी करंजा गावातील मच्छीमार बोटींना स्वस्त दरात बायो डिझेलची विक्री सुरू होती. या विक्री करणाऱ्यांवर नवी मुबंई पोलिसांनी धाड टाकत ४ टँकर पकडून गुन्हा दाखल केला होता.

परंतु करंजा गावात गेली अनेक दिवसांपासून टँकर द्वारे मच्छीमार बोटींना बायो डिझेलची विक्री नारायणाच्या कृपेने गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे. बाजारभाव डिझेलचा दर हा लिटरमागे ९० ते ९५ रुपये इतका असताना बायो डिझेल लिटर मागे ६७ रुपयांनी विक्री सुरू आहे. लिटर मागे १५ ते २० रुपये वाचत असल्याने बायो डिझेलला मागणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

नवी मुबंई व उरण पोलिसांनी स्वस्त दरात बंदी असलेल्या बायो डिझेलची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असताना. आजच्या घडीला करंजा गावात नारायणाच्या राजकीय वरदहस्ताने गेली अनेक दिवसांपासून स्वस्त दरात बायो डिझेलची विक्री सुरू आहे. दिवसाला ३ टँकर बायो डिझेलची विक्री होत आहे. याची कोणालाच कशी माहिती नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर बायो डिझेलचे टँकर उभे करण्यासाठी मेरिटाईम बोर्डच्या जागेचा वापर केला जात आहे. त्यांच्या सेवेसाठी मेरिटाईम बोर्डचा गेट सताड उघडा ठेवला जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी नुकतीच मुबंई येथे बैठक घेतली होती त्याठिकाणी संबंधित मत्स्यखात्याच्या अधिकारी वर्गाना बायो डिझेलची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असताना. मत्स्यविभागाचे अधिकारी डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधून याकडे जाणूबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे उघड होते. तरी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी करंजा गावात नारायणाच्या कृपेने स्वस्त दरात बायो डिझेलची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.