प्रकल्पात एकूण ३० हजार कोटीची गुंतवणूक : ७५ हजार लोकांना मिळणार रोजगार
सिटी बेल | मुंबई |
राज्य सरकारकडून रायगड जिल्ह्यात सुमारे पाच हजार एकरमध्ये ‘बल्क ड्रग्ज पार्क’ उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा व मुरुड तालुक्यात पाच हजार एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीऐवजी रायगड जिल्ह्याला बल्क ड्रग्ज पार्कसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. त्यात एमआयडीसीचा वाटा मोठा असावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार देशातील काही ठिकाणी बल्क ड्रग्ज पार्क उभारणार आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे; मात्र केंद्राने अद्याप ठिकाण ठरवलेले नाही. राज्य सरकारनेही रायगड जिल्ह्यातील रोहा व मुरुड तालुक्यात पाच हजार एकर जागा निश्चित केली आहे.रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा या तालुक्यातील १७ गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही गावाचे स्थलांतर न करता हा प्रकल्प साकारणार आहे. प्रकल्पात एकूण ३० हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. यातून ७५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
महाराष्ट्राचा देशातील औषधे उत्पादनात २२ टक्के वाटा असून निर्यातीतील २० टक्के आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेसकडून दिंडोरी येथे दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला आहे.

















Be First to Comment