Press "Enter" to skip to content

रत्नमाला कर्णबधीर मतिमंद विद्यामंदीर कळंबोली यांच्यातर्फे साजरी झाली अनोखी मंगळागौर

तृतीयपंथीयांनी साजरी केली मंगळागौर : कर्णबधीर, मतिमंद विद्यार्थ्यांनीही घेतला सहभाग

सिटी बेल | कळंबोली |

रत्नमाला कर्णबधीर मतिमंद विद्यामंदीर यांच्यातर्फे दिनांक 31 ऑगस्ट, 2021 वार मंगळवार रोजी कळंबोली येथे अनोखा मंगळागौर कार्यक्रम पार पडला.

मंगळागौर या सणाची परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. नवविवाहीत महिलांसोबतच यावर्षी हा सण तृतीयपंथीयांसोबत साजरा करण्यात आला. स्त्रीलिंग, पुल्लिंग जसे लिंगाचे प्रकार आहेत. तसाच नंपुसकलिंगहाही एक प्रकार आहे. यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अन सर्वांमध्ये मिसळण्याचा अधिकार आहे हा विचार करुन समाजामध्ये जागरुकता वाढावी या हेतूने शाळेचे प्रमुख अमोल आंबेरकर आणि सौ. माधुरी आंबेरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेतील सर्व कर्णबधीर, मतिमंद विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.

कार्यक्रमावेळी तृतीयपंथी म्हणून ज्ञानेश्वर बनगर, अनिकेत कुवेसकर आणि आतिश पवार उपस्थित होते. तसेच शाळेचे हितचिंतक, सहकारी, बांधिलकी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पल्लवी निंबाळकर याही उपस्थित होत्या.

समाजातील प्रत्येक घटक समान आहे त्यामुळे सर्वांना समानतेची वागणूक देऊन एकोपा प्रस्थापित करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असे मत सौ. माधुरी आंबेरकर यांनी व्यक्त केले. समाजात तृतीयपंथी यांनाही हक्काने वावरता यावं यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे नियोजन केले असे मत अमोल आंबेरकर यांनी व्यक्त केले.

इतरांना जशी भूक लागते, जशा भावना आहेत तशाच भावना आम्हालाही आहेत, आम्ही वेगळे नाही आहोत हे समाजाने स्वीकारावं असं मत ज्ञानेश्वर बनगर यांनी व्यक्त केले. तृतीयपंथी म्हणजे वाईट हा समज अत्यंत चुकीचा आहे. आम्हीही तुमच्या आमच्यासारखी माणसं आहोत त्यामुळे आम्हालाही माणूस म्हणून बघा असं मत आतिश पवार यांनी व्यक्त केले.

तृतीयपंथी यांनाही आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे, समाजात आम्हाला स्वीकारलं जात आहे हा सकारात्मक बदल दिसून येत आहे असं मत अनिकेत कुवेसकर यांनी व्यक्त केले. तृतीयपंथी वेगळे नसून आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांच्या विकासासाठी पुढे येऊन जागृती करणे आपली जबाबदारी आहे असं मत बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर यांनी व्यक्त केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.