Press "Enter" to skip to content

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची सतरा पदे रिक्त

कार्यरत असलेल्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर येतोय कामाचा ताण

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

जिल्ह्यातील महत्वाच्या व मध्यवर्ती अशा नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात व या केंद्रांतर्गत असलेल्या उपकेंद्रात सुमारे १७ कर्मचाऱ्यांची विविध पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असूनही मोठा कालावधी उलटूनही ही पदे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. याशिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा देण्यात अडचणही येत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे रुग्णांना किमान प्राथमिक उपचार तरी वेळेत मिळण्यासाठी नागोठणे हे महत्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र समजले जाते. अपघातग्रस्त रुग्णांबरोबरच येथे दररोज उपचारासाठी येणाऱ्या बाह्य रुग्णांची संख्याही खूप मोठी आहे. याशिवाय सध्या कोरोना १९ च्या लसीकरणाचे कामही नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व उपकेंद्रात सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

उपलब्ध माहितीनुसार नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्य स्थितीत कनिष्ठ सहाय्यक पदाची एकमेव जागा रिक्त आहे. तर शिपायांच्या तीन पैकी दोन जागा रिक्त आहेत. नागोठणे आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सात उपकेंद्रातील महिला आरोग्य सेविकांची (एएनएम) केवळ ३ पदे भरलेली असून मेढा, पळस, ऐनघर व खांब या उपकेंद्रातील महिला आरोग्य सेविकेंची चार पदे रिक्त आहेत. तर पुरुष आरोग्य सेवकांचे (एमपीडब्लू) ६ पैकी केवळ एकाच पद भरलेले असून वणी, खांब, ऐनघर, यशवंतखार, मेढा या उपकेंद्रातील ५ पदे रिक्त आहेत. याशिवाय महिला आरोग्य सेविकांचे (एनएचएम) ६ पैकी केवळ एकच पद भरले असल्याने वणी, खांब, ऐनघर, यशवंतखार व पळस उपकेंद्रातील महिला आरोग्य सेविकांची ५ पदे रिक्त आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येने उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना अनेकवेळा कामासाठी उपकेंद्रात जावे लागत आहे. त्याचा परिणाम नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेवर होत असल्याने रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रिक्त पदांच्या जागी नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु असून ऑक्टोबर, २०२१ पर्यंत ही प्रक्रिया जिल्हा आरोग्य विभागाकडून पूर्ण करण्यात येईल असेही डॉ. सुधाकर मोरे यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.