सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकाऱ्याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार याच कंपनीत काम करणाऱ्या महिलेने रसायनी पोलिस ठाण्यात केली आहे.याबाबत कॅमलिन कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तो अद्याप मोकाट असल्याने त्याला अटक व्हावी यासाठी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्यावतीने रसायनी पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे.
कामगार महिलेचा विनयभंग करण्यास कारणीभूत असलेला कंपनी अधिकारी दिलीप तायडे व त्याचे सहकारी यांना त्वरित अटक करावी शिवाय कोकीओ कॅमलीन कंपनी व्यवस्थापनाने सदर अधिका-याला व सदर विषयाशी संबंधित सहका-यांना निलंबित करावी अशी मागणी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेने केली आहे.अन्यथा कोरोना पाश्र्वभूमीवरील नियमांचे पालन करुन कंपनी गेटबाहेर बेमुदत उपोषणाचा इशारा हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस घनःश्याम नाईक, जिल्हा युनिटचे केवळ माळी यांनी दिला आहे.
कॅमलिन कंपनीमध्ये काम करणा-या एका महिलेशी कंपनीमधील अधिकारी दिलीप तायडे हा गेल्या काही महिन्यांपासून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता.दमदाटी करून पिडीत महिलेला गप्प केले जात असे,तायडेच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर पिडीत महिलेने रसायनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली.परंतू दिलीप तायडे याला व्यवस्थापनाने निलंबित करावे तसेच त्याला रसायनी पोलिसांनी अटक करावी अशी मागणी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.








Be First to Comment