Press "Enter" to skip to content

जागतिक वडापाव दिनानिमित्त घरी बनविलेले वडे खाण्याचा डॉक्टरांचा आग्रह

पोटविकारामुळे शहरातील नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे निरीक्षण

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

आज जागतिक वडा पाव दिनानिमित्त आपल्या आवडीच्या ठिकाणी मिळत असलेल्या वडा पावचे फोटो आठवणी अनेकजण सोशल मीडियावर शेयर करीत आहेत परंतु गेल्या दीड वर्षभर आपण सर्वजण कोरोनाची लढाई लढत आहोत तसेच भविष्यात येणाऱ्या संभाव्य कोरोना लाटांचा धोका लक्षात घेता जागतिक वडा पाव दिनानिमित्त घरी बनविलेले वडे खाण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना  घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व लॅप्रोस्कॉपिक तज्ञ डॉ. अनिरुद्ध पाटील सांगतात, ” भविष्यात कोरोना लाटेचा धोका लक्षात घेता आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे महत्वाचे आहे, कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण मुंबईतच आढळले होते याची कारणे अनेक असू शकतात परंतु ” प्रतिकारशक्ती ” हा एक महत्वाचा घटक आपल्याला विसरून चालणार नाही.

मुंबईकरांचे जीवन हे घड्याळाच्या काट्यावर चालत असून आहार व विहार या दोन्ही बाबतीत मुंबईकर आजही तितके सिरीयस दिसत नाहीत. भूक लागल्यावर ८० टक्के मुंबईकर वडापाव अथवा भजी, पाणीपुरी समोसा व इतर तळलेले पदार्थ खातात व यातील ५० टक्के मुंबईकर रस्त्यावर मिळणारे पदार्थ खातात हे एका सर्वेक्षणानुसार सिद्ध झाले आहे.

या फेरीवाल्यांच्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या  पदार्थांमध्ये भजी, सामोसे, वडे अशा तळल्या जाणाऱ्या पदार्थांचं आकर्षण सर्वांत जास्त असतं. याकरता जे तेल सकाळी एकदा काढईत टाकलं जातं, तेच दिवसभर उकळलं जात असतं. त्यातील शिल्लक तेल परत दुसऱ्या दिवशी वापरलं जातं. यामुळे त्या तेलाचे विघटन होऊन सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड  तयार होतं.

तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने हृदयविकार, ब्लडप्रेशर, यकृताचे आजार, कॅन्सर, अपचन यासारखे दुर्धर आजार हाेत आहेत.तेल, चीज अशा पदार्थांच्या वापरामुळे यात असलेले भरपूर उष्मांकदेखील वजनवाढीस कारणीभूत ठरतात. २५० ते ५०० कॅलरी असलेली ही खाद्यं हृदयासाठी जास्त धोकादायक असतात.

आजमितीला मुंबईतील अंदाजे ३० ते ४० टक्के नागरिक हे पोटाच्या विकारांनी त्रस्त असल्यामुळे या नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याचे पाहायला मिळते व अशा नागरिकांना संसर्गजन्य आजारांचा विळखा लवकर बसू शकतो कारण या नागरिकांमध्ये अपुरी झोप, कायम पोटामध्ये मळमळ असणे, उत्साहाचा अभाव अशी लक्षणे आढळून येतात त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. ”  

पोटांच्या आजारांवर माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे उदरविकार तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक शल्यविशारद डॉ. नितीन तवटे सांगतात,” पोटाच्या सर्व रोगांचे मूळ कारण हे मंद झालेला अग्नी हेच असते. त्यामुळे अजीर्ण, अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, आमांश, अल्सर, मूळव्याध ,भगंदर, पित्ताशयामध्ये खडे, अल्सरेटीव कोलायटिस, कावीळ, जलोदर, लिव्हर सिरॉसिस, ग्रहणी, इर्रिटेबल बोवेल यांसारखे अनेक विकार होतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अनेक नागरिकांनी भीतीने आयुर्वेदिक अथवा घरगुती काढ्याचे सेवन केले होते त्यामुळे अनेकांना पोटाचे व मूळव्याधीचे आजार झाले होते आता दुसऱ्या लाटेनंतर सेल्फ मेडिकेशनमध्ये वाढ झाली आहे. बऱ्याच वेळा निदान न झाल्याने पोटाचे आजार बळावतात आणि मग मोठमोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. संतुलित आणि प्रोटिनयुक्त आहार व पुरेशी झोप घेऊन प्रतिकारशक्ती वाढवता येते.

खाद्य विक्रेत्यांच्या स्वच्छतेबाबत, तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या  आरोग्याबाबत आणि पदार्थांच्या शुद्धतेबाबत शासनाने  पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार पोटाच्या विकाराने १० पैकी ४ भारतीय नागरिक हे पोटाच्या विकारांनी त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी फूड सेफ्टी अँड  स्टॅडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने तीन वेळा पेक्षा जास्त तेलाचा वापर तळण्यासाठी करू नये असे आदेश जारी केले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.