Press "Enter" to skip to content

उरण महाविकास आघाडीची नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला विरोधात उरण महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरण नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल व आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल असा विश्वास आघाडीचे प्रवक्ते जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केला.

यावेळी महाविकास आघाडीतर्फे शेकापचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीकडून प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, भावना घाणेकर, आंनद भिंगार्डे, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, महादेव घरत, गटनेते गणेश शिंदे, शेकापकडून तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, काका पाटील, काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, शहर अध्यक्ष किरीट पाटील, अकलाख शिलोत्री, नगरसेवक अतुल ठाकूर, समीर मुकरी व आघाडीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

उरण नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. नगरपालिकेची मुदत काही महिन्यात संपणार आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी उरणमध्ये महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्यासाठी उरण महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाने मनमानी कारभार करीत जतनेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. शहरात वाहतूक कोंडी, रस्त्यांची अपूर्ण कामे, विजेचा लपंडाव, पाणी टंचाई, टाऊन हॉल, नगरपालिका कार्यालय, बायपास रस्ता, सभागृह आदींचे मोठ्या थाटामाटात भूमिपूजन केले होते. परंतु सदर कामे ५ वर्ष पूर्ण होण्यास येऊनही कोणतेही काम पूर्ण झाले नाही. उलट विकास कामांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार मात्र करण्यात भाजपा आघाडीवर असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला.

उरण शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.