कल्याण येथील १२ वर्षाच्या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी काढला ६५० ग्रॅम केसांचा गोळा
सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |
कल्याण शहरात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून ६५० ग्रॅम केसांचा गोळा काढण्यात स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. पोटाच्या आतड्यांवर पूर्णपणे ताबा मिळविलेल्या केसांचा गोळा दोन तासाच्या गुंतागुंतीच्या शल्यचिकित्सेनंतर काढण्यात आला.
याविषयी अधिक माहिती देताना कल्याण पूर्व येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. रोहित परयानी सांगतात, ” मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय लागली होती, या सवयीला ट्रायकोफेगिया असे म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सोडण्यास खूप प्रयत्न केले परंतु ती सवय सुटली नाही, गेल्या आठवड्यात ती स्टारसिटी हॉस्पिटलमध्ये भरती झाली तेव्हा तिचे वजन फक्त २० किलो होते म्हणजेच ५० टक्क्यांनी तिचे वजन कमी झाले होते. सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस दिसुन आले व गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवण जात नव्हते.
डॉ. रोहित परयानी पुढे सांगतात पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब करतो परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती म्ह्णूनच आम्ही ओपन सर्जरीचा मार्ग निवडला व हा केसाचा गोळा काढण्यात यशस्वी झालो. स्टारसिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या ऑपरेशन थिएटर व इतर सुविधांमुळे आम्हाला ही शस्त्रक्रिया करण्यात कोणतीही अडचण आली नाही.

शस्त्रक्रियेनंतर मुलीला जेवताना पाहून तिच्या पालकांना खूप आनंद झाला, तिला दोन दिवसांनी आम्ही घरी सोडणार आहोत.” या केसाच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबीझोअर म्हणतात. या दुर्मिळ प्रकारात केस खाल्ल्यामुळे असे गोळे तयार होतात. या केसांमुळे पोटाला ईजा होऊन पूदेखील तयार होतो. बालपणी केस खाण्याची सवय ट्रायकोबीझोअरला खतपाणी घालू शकते,न पचलेले केस हळुहळु शरीरात एकवटतात व गोळा तयार होतो. जसजसा या गोळ्याचा आकार वाढायला लागतो, तसतशी पोटदुखी सुरु होते अनेकवेळा योग्य निदान झाले नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते.
नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर रेअर डिसऑर्डरच्या मते, जागतिक लोकसंख्येच्या ०.५ ते ३ टक्के नागरिकांना त्यांच्या आयुष्याच्या काही टप्प्यावर ट्रायकोफेगियाची म्हणजेच स्वतःचे केस खाण्याची सवय लागते परंतु पालकांच्या अथवा घरातील नातेवाईकांच्या मदतीने ही सवय अनेकांची सुटते, अशी माहिती स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.








Be First to Comment