Press "Enter" to skip to content

दप्तराचे ओझे कमी होऊनही शालेय विद्यार्थ्यांना होतोय पाठदुखीचा त्रास

कॉम्पुटर व मोबाईल वापरामुळे लहान मुलांमध्ये वाढ आहेत पाठदुखीचे विकार

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

कोरोना महामारीच्या आधी जीवनसत्त्वाचा अभाव, तसेच अभ्यासाला किंवा वर्गात बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे तसेच दप्तराच्या ओझ्यामुळे लहान मुलांना पाठदुखीचा त्रास होत होता परंतु लॉकडाउनमध्ये दप्तराचे ओझे कमी झाले असले तरीही मोबाईल व कॉम्पुटर तसेच लॅपटॉपच्या अति वापरामुळे आता लहान मुलांना पाठदुखी, मानदुखी व मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व कार्डियाक केयर सेंटर यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात घरून काम करीत असलेल्या नागरिकांसोबतच ८ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये मानदुखी तसेच मणक्यांच्या आजारात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड म्हणाले, “आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मेंदू व मणक्याच्या विकारांवर अत्याधुनिक क्लीनिक सुरु केले असून भारतातील तज्ञ डॉक्टर उपचारांसाठी उपल्बध असणार आहेत. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा सामना आपल्या सर्वांनाच करावा लागत आहे त्यामुळे आपल्या शरीराची हालचाल ७० टक्के कमी झाली असून अनेकांना दिवसातले ८ ते १० तास कॉम्पुटरवर काम करावे लागत आहे तसेच शालेय विद्यार्थाना सुद्धा ४ ते ५ तास मोबाईल अथवा लॅपटॉपवर ऑनलाईन शिक्षणासाठी उपल्बध राहावे लागते.

सतत सोफ्यावर, खुर्चीवर तसेच दिवसभर संगणकासमोर बसून काम केल्यामुळे लहान मुलांना मानदुखी व पाठदुखीच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. डॉ. अभय गायकवाड पुढे सांगतात की आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये सततच्या दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास जाणवतो परंतु लॉकडाउन मुळे दप्तरा पासून उसंत मिळाली असली तरीही ऑनलाईन शिक्षणामुळे पाठदुखी व मानदुखीचा त्रास सुरु झाला आहे कारण या वयात मुलांच्या अवयवांची वाढ होत असते व अशावेळी जर त्यावर ताण निर्माण झाला तर अवयव आकुंचन पावतात व कायमस्वरूपी दुखणे सुरु होते म्हणूनच मुलांना या वयात पोषक आहार व बसण्याच्या योग्य पद्धती व नियमित व्यायामाची सवय लावली पाहिजे.

हा वयोगट खरं तर वयात येण्याचा. मुलांमध्ये या वयात शारिरिक बदल होत असतात. यावेळी पाठीचा कणा, त्यांची बसण्याची पद्धत, मान, कंबर आणि पायांच्या स्नायूंवर ताण कसा कमी येईल याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. या वयोगटात मुलींना मासिक पाळी सुरु होते त्यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात. गेल्या दीड वर्षात शाळा बंद असल्याने मुले घरीच आहेत व व्यायाम व नियमित हालचाली थांबल्यामुळे अनेक मुलांमध्ये अतिरिक्त वजन वाढले आहे व त्यामुळे सुद्धा सांधेदुखी, पाठदुखीचे आजार वाढत आहेत.”

अनेक तास स्क्रिनसमोर बसणे मुलांच्या शरीरासाठी वाईट ठरू शकते. कारण यामुळे डोळे, मान आणि मागच्या स्नायूंवर अनावश्यक ताण पडतो. म्हणून एका तासानंतर एक ब्रेक असायला हवा. या वेळात मुलांना घरामध्ये चालवावे अथवा छोटीशी कवायत करण्यास सांगावे. पाठीचा कडकपणा, थकवा व मानदुखी थाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांच्या बसण्याच्या पद्धतीकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे मत सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभय गायकवाड यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.