इंजेक्शनसाठी रूग्णांना बसतोय आर्थिक भुर्दंड
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
धनुर्वात व इतर काही महत्वाच्या प्रसंगी देण्यात येणारे टी.टी. इजेक्शन तसेच श्वान दंशावर लागणारे इंजेक्शन यांचा नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे टी.टी. चे इंजेक्शन घेण्यासाठी नागोठणे प्रा. आ. केंद्रात येणाऱ्या रुग्णाला मेडिकल स्टोअर्स मधून हे इंजेक्शन आणावे लागत असुन त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे मध्यवर्ती असे आरोग्य केंद्र आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठीही हे महत्वाचे आरोग्य केंद्र आहे. त्यामुळेच या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्याही खुप मोठी आहे. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाळ्यातील साथीचे आजार, सर्प दंश व इतर औषधांचा पुरवठा मुबलक आहे. मात्र गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या आरोग्य केंद्रात टी.टी. च्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे शहर व परिसरात वाढलेली कुत्र्यांची संख्या पाहता येथे दररोज कुणाला ना कुणाला तरी श्वान दंश होण्याच्या घटना घडत असतात. असे असूनही श्वान दंशावर लागणारे इंजेक्शनही येथे नियमित मिळत नसल्याने त्याचाही इथे अधुन मधून तुटवडा निर्माण होत आहे. यावर जिल्हा रुग्णालयाकडून लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, टी. टी. च्या इंजेक्शनचा पुरवठा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडूनच गेल्या काही महिन्यांपासून कुठेही होत नसल्याने सध्या या इंजेक्शनचा तुटवडा आहे. तर श्वान दंशावर लागणारे इंजेक्शन सध्या कमी प्रमाणात येत असले तरी या दोन्ही इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल असेही डाॅ. मोरे यानी स्पष्ट केले.








Be First to Comment