Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात

चाणजे ग्रामपंचायतच्या सामान्य कॅशबुकच्या झेरॉक्स फेसबुक व व्हाट्सएप ग्रुपवर व्हायरल : वाचा काय आहे प्रकरण ?

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे. दररोज व्हाट्सएप व फेसबुकच्या माध्यमातून चाणजे ग्रामस्थांनी होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल ग्रामपंचायत व सदस्यांना जाब विचारला जात आहे. मात्र याबाबत ग्रामपंचायत अथवा सरपंच किंवा कोणी सदस्य उत्तर देत नसल्याने चाणजे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा सुरू आहे.

चाणजे ग्रामपंचायतच्या सामान्य कॅशबुकच्या झेरॉक्स व्हाट्सएप ग्रुपवर फिरत आहेत. त्यामध्ये जी कोट्यवधी रक्कम खर्च केल्याचे दाखविले आहे. त्यामधील अनेक प्रकारचे सामान हे संबंधित ठेकेदारांनी दिले नसल्याचे समजते. ग्रामस्थांनी माजी ग्रामपंचायत सदस्यांकडे याची विचारणा केली असता त्यांनीही सदरचा सामान हे आलेलेच नसल्याचे सांगितले आहे. मग कोट्यवधी रुपयांचे सामान नक्की गेले कुठे की संबंधित ठेकेदारांना सामान न देताच आर्थिक हितसबंधातून सदरची रक्कम परस्पर आदा करण्यात आली का ? याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यात व तालुक्यात ग्रामपंचायत व नगरपालिका यांना सामान पुरविण्याचा ठेका घेणारे हे तरी अधिकृत धारक आहेत का ? तसेच एखाद्या सामानाचा बाजारभाव 100 रुपये असताना ते त्याच वस्तूचा भाव 400 ते 500 रुपये कसे लावतात. ठेकेदार हे व्हॅट व जीएसटी भरतात का याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक बनली आहे.

चाणजे ग्रामपंचायतच्या सामान्य कॅशबुक मध्ये फवारणी, चाणजे ग्रामपंचायत प्राथमिक शाळा हायटेक डिजिटल फक्त कागदावर, सौरदिवे खरेदी केली प्रत्यक्षात खरेदी केलेली नाही, द्रोणागिरीमंदिर येथेही एकही सौरदिवे लावलेले नाहीत अशा प्रकारचे आरोप ग्रामस्थांकडून व्हाट्सएपच्या माध्यमातून होताना दिसत आहे. याबाबत ग्रामसेवक भास्कर पालकर यांच्याकडे विचारणा केली असता जी सामान्य कॅशबुक च्या झेरॉक्स व्हाट्सएप व फेसबुकवर फिरत आहेत, त्या ग्रामपंचायतच्या असल्याची कबुली देऊन त्यावेळी मी नव्हतो. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे की नाही हे पहावे लागेल असे सांगितले.

मात्र गेले काही महिन्यांपासून चाणजे ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत वरिष्ठ अधिकारी वर्गानीही दोषारोप ठेऊन चौकशीचे आदेश दिले होते. तसेच आता सामान्य कॅशबुकच्या झेरॉक्स प्रति व्हाट्सएपच्या माध्यमातून फिरत आहेत. त्यामध्ये खर्च करण्यात आलेली रकमेचा आकडेा हे मोठे आहेत. तर सामान देणारा ठेकेदार ही गेली अनेक वर्षे एकच असल्याने नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे चाणजे ग्रामपंचायतचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. त्यामुळे चाणजे ग्रामपंचायत याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.