सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
अंगारकी चतुर्थीला भाविकांनी ओसंडून वाहणारे महड येथील वरदविनायक मंदिर मंगळवारी गणेश भक्ताविना सुनेसुने होते. कोरोना निर्बंधा मुळे अंगारकी संकष्टीला गणेश भक्त आणि बापाची भेट होऊ शकली नाही.
तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक महड येथील वरदविनायकाचं मंदिर दर्शनासाठी बंद आहे. नेहमी भाविकांच्या गर्दीने फुललेले मंदिर प्रशासनाच्या आदेशानुसार सध्या बंद आहे. मंदिर जरी बंद असले तरी भाविक मुखदर्शनावर समाधान मानतात .
मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी असल्याने मोठ्या संख्येने भाविक महड येथे येणार या शक्यतेमुळे देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनाने अगोदरच मंदिर बंद असल्याचे संदेश फलक लावले होते. भाविक न जुमानता मोठ्या संख्येने येणार हे ओळखून खालापूर पोलीस प्रशासनाने मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करून त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले.
मंदिर परिसरात देखील सर्व बाजूने बांबू आणि लोखंडी पाईप बांधून परिसर सील करण्यात आला होता. बाप्पाच्या भोवती सुरक्षारक्षक आणि पोलिसांची वेढा होता.दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना परत मागे पाठवले जात होते. राजकीय कार्यक्रमांना गर्दीत चालते मग बाहेरून दर्शनाला भाविकांना अडथळा का असा प्रश्न नाराज भाविक करत होते.
Be First to Comment