Press "Enter" to skip to content

सरकारी काम आणि पन्नास वर्षे थांब…

अर्धशतकाहून अधिक वर्षापासून कार्यरत नांदगावच्या आरोग्य पथकास अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा नाही !

सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन |

स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशातील गोरगरीब जनतेला चांगली आरोग्यसेवा लाभावी म्हणून खेडोपाडी निर्माण करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्याआरोग्य पथकातील मुरुड तालुक्यातील नांदगावच्या काशिनाथशेठ पांडुरंग कुलकर्णी आरोग्य पथकाला पन्नास वर्षाहून अधिक कालावधी लोटला असला तरी अद्यापपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा प्राप्त न झाल्याने यशवंतनगर पंचक्रोशीतील सुमारे पंचविस हजाराहून अधिक जनतेच्या आरोग्याची परवड सुरु आहे.

यशवंतनगर पंचक्रोशीतील नांदगावसह मजगाव,उसरोली,वावे,वांद्रे वेळास्ते,विहुर , काशिद ग्रामपंचायत हद्दीतील जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी नांदगाव येथे सदर आरोग्यपथक कार्यरत असून तेथे एक डाॅक्टर,एक मिश्रक,दोनतिन परिचारीका,व सफाई कामगार असा कर्मचारी वृंद काम करीत आहे.जवळपास शंभरापर्यंत दररोजची ओ.पी.डी आहे. प्रारंभी ते नांदगावमध्ये भाड्याच्या इमारतीत होते परंतु नांदगावमधिल एक समाजसेविका श्रीम.वत्सलाबाई चिटणीस व त्यांचे कुटुंबीय गजानन व भालचंद्र कुलकर्णी यांनी वत्सलाबाईंचे बंधु कै.काशिनाथशेठ पां कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीचे बांधकाम करुन इमारत रायगड जिल्हा परिषदेच्या 25 मार्च 1979 रोजी ताब्यात दिली.सदर जागेत डाॅक्टर व अन्य कर्मचार्यांसाठी स्वतंत्र खोल्यांही बांधण्यात आल्या आहेत.तेव्हापासून गेली चाळीस वर्षे हे आरोग्य पथक रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे.

परंतु त्यास प्राथमिक आरोग्यकेंद्राचा दर्जा प्राप्त न झाल्याने एम बी.बीएस डाॅक्टरसह अन्य कर्मचारी,यंत्र सामग्री,आवश्यकसर्जरी व औषधे आदी बाबतीत काही मर्यादा पडत आहेत. वेळ पडल्यास एखाद्याअत्यवस्थ रुग्णास येथून दहा ते पंधरा कि.मी.अंतरावरील बोर्ली मांडला अथवा मुरुड शहरातील दवाखान्यांवर अवलंबून रहावे लागते नाहीपेक्षा अलिबाग,रोहा व अन्य शहरातील दवाखान्यात जाणे भाग पडते पण अनेकदा तेथे जाई पर्यंत रुग्ण वाटेतच दगावल्याची उदाहरणे आहेत. शिवाय येथिल नांदगाव व काशिदच्या समुद्रकिनार्याला भेट देणार्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.त्यातून घडणार्या दुर्घटनाग्रस्तांनाही बोर्ली,मुरूड अथवा अलिबागच्या दवाखान्यावर भिस्त ठेवावी लागते.त्यावर काळाचेवेळेचे बंधन येते.

सध्याच्या कोरोना महामारीवरील उपलब्ध लसीकरणासाठीही येथिल जनतेची बोर्ली,मुरुड
येथे जाण्यासाठी फरपट होत होती.परंतु तेथिल आरोग्यसेवेवरील ताण लक्षात घेऊन खासदार सुनिल तटकरे यांनी या दवाखान्यात बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत लसीकरण उपलब्ध करुन दिले आहेमात्र तेथूनही मिळणार्या कमी डोसांमुळे पथकाची वाट बिकटच होत आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात नुकतीच दोन प्राथमिक केंद्रे मंजुर करून घेतली आहेतसध्या कोरोनामुळे देशासह राज्यातील शासन जनतेच्या आरोग्यावर अधिक लक्ष देत असल्याने पालकमंत्र्यांनी सदर आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच याकामी रायगडचे खासदार सुनिल तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांनीही आपले योगदान द्यावे अशी मागणी मुरुड तालुका पत्रकार संघातर्फे त्यांना देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.