राज्य सरकारने केली दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक
सिटी बेल| उरण | घन:श्याम कडू |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र मूल्यांकनानुसार दहावीचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा मात्र बंधनकारक करण्यात आली आहे. सीईटीचे अर्ज भरण्यासाठीची हँग झाली आहे. दहावीचा निकाल लागला त्यावेळीही वेबसाईट हँग झाली होती. आता पुन्हा सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईट हँग झालेली असल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.
राज्य सरकारने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक केली आहे. विद्यार्थ्यांनी सीईटीचे अर्ज भरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र वेबसाईट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन करून गुण देण्यात आले आहे. मात्र या मूल्यमापनावर राज्यभरातून टीका झाली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने अकरावी वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे.
या सीईटीचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगणक केंद्रावर गर्दी केली आहे. मात्र, सीईटीचे अर्ज भरण्याची वेबसाइट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाही. या वेबसाईटवर तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ तात्पुरत्या वेळेसाठी बंद करण्यात आले आहे, असा मेसेज दिसत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत शासकीय पातळीवर चौकशी केली असता कोणताच अधिकारी वर्ग यावर ठोस अशी माहिती देत नाही. त्यात सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जुलै पर्यंत आहे. मुदत संपण्यास अवघे २ दिवस उरले असतानाही वेबसाईट सुरू होत नाही. त्यामुळे नक्की काय करायचे अशा संभ्रमात पालक व विद्यार्थी सापडले आहेत. तरी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात लक्ष घालून तो निकाली काढावा अन्यथा वेबसाईट त्वरित सुरू करण्याची मागणी पालक वर्गाकडून जोर धरू लागली आहे.








Be First to Comment