Press "Enter" to skip to content

गोवठने ग्रामपंचायतचा अजब कारभार

निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वीच पाईपलाईनचे काम पूर्णग्रामपंचायतच्या अवैध आणि बेकायदेशीर पाईप लाईनच्या कामाची चौकशी करण्याची आमदार महेश बालदी यांची पंचायत समिती कडे मागणी


सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

वरातीमागून घोडे हि म्हण तुम्ही ऐकली असेलच.असा काहीसा प्रकार गोवठणे ग्रामपंचायत मध्ये घडला आहे .शासकीय काम म्हटलं की निविदा नंतर मंजुरी आणि शेवटी अमंलबजावणी अशी प्रक्रिया असते.यामध्येही सरकारी काम आणि तीन महिने थांब हे ठरलेलंच.पण उरण तालुक्यातील गोवठणे ग्रामंपचायत मध्ये मात्र आधी काम नंतर निविदा असा अजब प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वृत्त असे की 15 व्या वित्त आयोगानुसार गोवठणे ग्रामपंचायतीत रामेश्वर म्हात्रे यांचे घर ते स्मशानभूमी आणि धनाजी वर्तक ते राजेंद्र म्हात्रे यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे अशी 310000 ₹ ची प्रस्तावित कामे होती.सदर कामाबाबत ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या स्वाक्षरीने वृत्तपत्रात जाहिरात देखील दिली होती.जाहिरात नुसार कामाची निविदा भरण्याची अंतिम दिनांक 22जुलै 2021 होती.पण गम्मंत पहा.निविदा दाखल दिनांका आधीच, निविदा प्रसिद्ध होण्याआधीच सदर पाईपलाईन चे काम पूर्णत्वास गेले आहे.निविदा न घेताच काम मंजूर करुन पूर्णत्वास गेले.त्यामुळे सदर प्रकरणाला भ्रष्टाचाराचा वास येत आहे.

शासकीय नियमानुसार निविदा मागवून आणि त्यातील योग्य व उत्कृष्ट कामाची हमी देणाऱ्या निविदेला मंजुरी देऊन काम केले जाते.मात्र इथे पूर्णपणे शासकीय नियमाला हडताल फासला आहे.कोणतीही शासकीय प्रक्रिया न राबवता काम देऊन ते नित्कृष्ट दर्जाने पूर्ण केले आहे.सदर कामासाठी वापरण्यात आलेले पाईप हे कमकुवत आहेतच.सोबतच शासकीय नियमानुसार खोलवर पाईपलाईन टाकायचे सोडून उघड्यावर पाईप्स टाकण्यात आले आहेत. यांमुळे भविष्यात वाहनांचा घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.

सदर कामांबाबत काही प्रश्न उपस्थित राहतात की निविदा न घेता काम कसे सुरू झाले ? ग्रामसेवक व सरपंचांनी यांस मंजुरी कशी दिली ? नित्कृष्ट दर्जाचे काम होत असताना प्रशासन आणि सत्ताधारी गप्प का ? ठेकेदारास किती रक्कम अदा झाली आहे ? कामाच्या साहित्याचा दर्जा कोणी ठरवला ? असे असंख्य प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत. त्यामुळे कुठेतरी भ्रष्टाचार झाला असल्याची कुजबुज ग्रामस्थांमध्ये आहे. तरी सदर प्रकरणाची प्रशासन दखल घेऊन संबधितांवर योग्य कारवाई करतील अशी भाबडी आशा ग्रामस्थ धरून आहेत.या सर्व ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून भाजपच्या तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे तसेच उरण विधानसभा मतदार संघांचे भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उरण पंचायत समितीकडे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.