गुरुवंदना
आधी मातापित्यासी वंदावे
मग इष्टदेवतेसि पूजावे
गुरुजनांना सदा स्मरावे
समस्त मनुजांनी.
मनीमानसी गुरु वसावा
गुरुनामाचा महिमा गावा
स्वत्वात कधी गुरु शोधावा
तो एक चतुर.
आप्तस्वकीय वा पर लोक
सान थोर वा राव रंक
ज्याच्या ठायी गुण असे एक
तो होई योग्य गुरु.
भक्ताने काही योजावे
गुरुमाऊलीने ते पूर्ण करावे
दोघांमधले नाते जाणावे
मायलेकरापरी.
गुरु ध्यास, गुरु श्वास
गुरु सुखाचा विश्वास
ज्यास लाभे गुरु सहवास
तो भाग्यवंत थोर.
गुरुच्या पायी शरणागती
गुरु देतसे शुद्धमती
गुरु अवघे जीवन तारिती
सकळ भक्तजनांचे.
गुरुच्या ठायी असता भक्ती
श्रद्धा ठेविता येते प्रचिती
गुरु अनुग्रहाची घ्यावी अनुभूती
एकदातरी जीवनी.
ऐसे जाणावे महात्म्य गुरुचे
खचित सरेल कारण व्यथेचे
अवघे जीवन होईल सुखाचे
आपुले सकळांचे.
अपर्णा साठे, नवीन पनवेल







Be First to Comment