Press "Enter" to skip to content

माथेरानचे राजकीय पक्ष राजकारणात मशगुल ; पर्यटनाकडे दुर्लक्ष

पर्यटन वाढीसोबत पर्यटकांना सेवासुविधा देण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा : स्थानिकांची मागणी

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

माथेरान मधील राजकीय परिस्थिती म्हणजे एकप्रकारचा बालिशपणाच म्हणावा लागेल अशी एकंदरीत अवस्था इथे पहावयास मिळते. प्रत्येक बाबतीत बाळहट्टा प्रमाणे राजकीय मंडळी वावरताना दिसतात. एकाच विषयावर आणि एकाच मुद्द्यावर शासन दरबारी मागणी करून याचे श्रेय आपल्या पारड्यात कसे पाडून घेता येईल याकडे कटाक्ष असतो.

माथेरान हे खूप छोटेसे गाव असून हिल स्टेशन असल्यामुळे इथे नगरपरिषदेची १९०५ साली स्थापना करण्यात आली होती.त्यामुळेच इथे लोकनियुक्त प्रतिनिधी आपापल्या परीने विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.सत्ता कोणत्याही पक्षाची असली तरी सुद्धा आपल्या माध्यमातून प्रलंबित कामे व्हायला हवी यासाठी नेहमीच इथे स्पर्धा पहावयास मिळते. नव्हे तर अनेकदा श्रेय लाटण्यासाठी सर्व पक्षांचा खटाटोप सुरू असतो. प्रत्येक पक्षाने प्रयत्न करणे आवश्यक आहे यात शंका नाही परंतु ज्या महत्वपूर्ण कामासाठी पुढे यायला हवे त्यासाठी सहसा कुणी धजावत नाही.

एखादी व्यक्ती गावाच्या हितासाठी काही सकारात्मक विचार करत असल्यास नाहक खोडा घालण्यासाठी नेहमीच आकस वृत्तीमुळे होणारी कामे सुध्दा वेळप्रसंगी प्रलंबित रहात आहेत.इथे खूप काही करण्यासारखी कामे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि राजकीय हेवेदाव्यांमुळे हे गाव विकासापासून वंचित राहिले आहे. इथे प्रत्येक राजकीय आणि अन्य क्षेत्रात चढाओढ आणि जलस वृत्ती ओतप्रोत भरलेली आहे.लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक सुध्दा एकसंध नाहीत त्यामुळे याचा लाभ परिसरातील लोक घेताना दिसतात.ज्यांचा या गावाशी काडीमात्र संबंध नाही की या गावाशी काहीही सोयरसुतक नाही अशा इथे पोट भरण्यासाठी आलेल्या लोकांचे चांगुलचालन केले जात आहे. परिणामी बाहेरून इथे व्यवसायासाठी आलेली मंडळी राजकारणात सुध्दा सक्रिय केली जात आहेत.

मुख्य भेडसावत असलेली वाहतूक व्यवस्था ही आजतागायत खूपच खर्चीक अन सर्वसामान्य लोकांना न परवडणारी आहे.ऐन सुट्टयांच्या हंगामात नेहमीच वीज,पाणी समस्या निर्माण होत असते इथे अनेक महिला वर्ग विविध क्षेत्रात अथवा संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी पदांवर कार्यरत आहेत या रणरागिनींकडून सुध्दा अनेक गोष्टी पूर्ण होऊ शकतात परंतु एकदा का फक्त नावावर पद आले की त्यासुद्धा गावाच्या अडचणी विसरून आपले पद टिकविण्यासाठी लक्ष केंद्रित करतात.

नेरळ माथेरान या एकमेव घाटरस्त्यावर येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ईथे गगनाला भिडल्या आहेत त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. घरगुती गॅसच्या दरात केवळ वाहतुकीच्याच कारणास्तव भरमसाठ वाढ झालेली आहे. लॉक डाऊनच्या कठीण काळात स्थानिक युवकांना कुटुंबाचा रहाटगाडा चालविण्यासाठी अतिकष्टदायक हातगाडी ओढण्याची कामे करावी लागत आहेत तर पिढ्यानपिढ्या इथे हातरीक्षा ओढून सुध्दा काही स्थानिक आपले जीवन जगत आहेत दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी काहींची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे त्यांना इथे अन्य काही औद्योगिक क्षेत्र नसल्याने नाईलाजाने घोड्याच्या व्यवसायात अथवा मोलमजुरी मध्ये गुंतावे लागत आहे.त्यामुळेच इथली एकएक पिढी व्यसनाधीन होऊन अर्ध्या आयुष्यात इहलोकीची वारी करत आहेत.

इथला भूमिपुत्र कशाप्रकारे सक्षम होईल, सर्वसामान्य लोकांना उपजीविकेचे साधन आणि पर्यटन विकास होईल जेणेकरून कुणालाही परावलंबी राहता येणार नाही त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थानचे पदाधिकारी, मंडळाचे सदस्य,सर्वच राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन राजकारण विरहित केवळ गावाच्या आणि इथल्या स्थानिकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नक्कीच हे दुर्गम भागातील पर्यटनस्थळ नावारूपाला येईल यात शंकाच नाही.

घोड्यावरून आणि हातगाडीच्या साहाय्याने मानवी श्रमाद्वारे मालाची वाहतूक केली जाते ही खूपच महागडी सेवा आहे त्यासाठी जीवनावश्यक वस्तू आणि इमारतीसाठी लागणारे सामान यांची वहातुक गावातील अंतर्गत भागापर्यंत आणण्यासाठी टेंपोला परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर इथली एकंदरीत भौगोलिक परिस्थिती कथन केल्यास शक्य होऊ शकते.राजकीय पक्षांनी केवळ राजकारणात मशगुल न रहाता पर्यटन वाढीसोबत पर्यटकांना सेवासुविधा देण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.