ओढ लावणारे घर
ओढ लावणारे घर असावे
सुसंवाद हवा मनामनात
नको द्वेष मत्सर कोणाचा
हाची गुण असावा नात्यात
आपले घर प्रत्येकाला प्रिय असते.मग ते अगदी कुडामेढीचे,गवताच्या छपराचे असले तरीही.आजकाल घरावरून माणसाची परीक्षा होते.घर सुंदर म्हणजे माणसेही प्रेमळ सुंदर असणारच ! हाच सगळ्यांचा घराकडे पाहून माणसाची परीक्षा पाहण्याचा एक गैरसमज झाला आहे. असो
घर हे नेहमी ओढ लावणारं असावं.असे म्हटले जाते. एखाद्या गोष्टींची ओढ कधी लागते तर मनापासून प्रेमळपणा, आपलेपणा, आपुलकी असली की,ओढ आपोआपच निर्माण होते. त्यासाठी सुसंस्कारित विचारांची गरज आहे. सुसंस्कारित विचार काही एकाकी निर्माण होत नाहीत त्यासाठी बालपणापासून तशी तयारी करावी लागते. बालमनावर जेवढे सुसंस्कार करू तेवढे ते बालपणापासून रूजले जातात. आपण पाहतो काही घराण्यातील माणसं ही एकमेकांसाठी किती जीव ओवाळून टाकणारी असतात. घरातील एखाद्या सदस्यावर प्रसंग आला की,सगळेजण धाऊन जातात आणि संकटसमयी सहकार्य करतात.तसेच सुखाच्या प्रसंगीही सर्वजण जबाबदारीने काम करून सुखात सहभागी होतात.
ज्या घरात प्रेम,माया,आपुलकी,आपलेपणा असतो त्या घराची ओढ ही आपोआपच लागते.असे आपुलकीने भरलेले घर सोडताना सासरी जाणाऱ्या मुलीला फारच गहिवरून येते.ती सतत रडत असते.माझ्या घरची आपुलकी,प्रेमळपणा सासरी मिळेल का ? तिथली माणसं खरोखरच मला समजावून घेतील का ? माझ्याबद्दल आपलेपणा दाखवितील का ? असे नाना प्रश्न तिच्या मनात निर्माण झालेले असतात आणि विचारांचे काहूर तिच्या मनामध्ये माजल्याने जड अंत:करणाने आपल्या माहेरच्या माणसांचा निरोप घेऊन सासरी जाते.” कन्या सासुराशी जाए,मागे परतूनी पाहे “
| याप्रमाणे तिची अवस्था निर्माण झालेली असते.का तर
तिने ओढ लावणारे घर कसे असते हे बालपणापासून अनुभवलेले असते.
ओढ लावणा-या घरात सारेच आनंदी व प्रसन्न वातावरणात राहत असतात, एकमेकांच्या प्रती प्रचंड जिव्हाळा व आपुलकी निर्माण झालेली असते.मनात कोणतीही कटूता न ठेवता प्रत्येकजण एकमेकांच्या हितासाठी धडपडत असतो.ओढ लावणारे घर हे रक्ताच्या अतूट नात्याने इतके घट्ट बांधलेले असते की,जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तरी आपल्या घराची ओढ ही आपोआपच लागते.हल्लीच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या व पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या समाजात पूर्वीच्या ओढ लावणा-या घरांची संख्या मात्र कमी झाली असल्याचे पहायला मिळत आहे. परंतू जे कुटुंब, जो समाज एकमेकांच्या बांधिलकीने घट्ट विणला आहे.अर्थातच त्यामुळे ते राष्ट्रही अशाच पद्धतीने घट्ट अशा बांधिलकीने गुंफले जाणार आहे.त्यासाठीच मुळात गरज आहे ती ओढ लावणा-या घराची. *श्री.नंदकुमार मरवडे,ता.रोहा, जि. रायगड.*
Be First to Comment