मन पायवाट चाले
नियतीने माझ्यावर लपेटली
अधूपणाची ती चादर
काय करु मी आता
कर ही येत नाही जोडता ।।१।।
नाही त्राण हाती पायी
नित्यकर्म ही परावलंबी
जीवन झाले बेढंगी
दैवाने क्रूर दिली तंबी ।।२।।
मन पायवाटेवर धावत होते
तेवढेच काय ते सुख होते
समजत होते सर्वकाही
करता मात्र येत नव्हते काहीही।।३।।
वाट माझी संपावी
काहुर मनी दाटे
परी माऊलीची ती हुरहूर
पिता ही तसाच चिंतातूर।।४।।
मनाच्या पायवाटेवर कितीतरी काटे
उठता बसता भय केवढे वाटे
दुःखाचे ते कढ होते
वरुन कुणाला दाखवत नव्हते।।५।।
माऊली माझी धीराची
बापाचेही सांत्वन करी
अढळ विश्वास विधात्यावर
नक्की बरा तोच करेल ,यावर ।।६।।
उपास तापास ,नवस सायास
शर्थीच्या प्रयत्नाचा लागला कस
देवाला खाली यावेच लागले
मातेच्या तपश्चर्येला फळ आले *।।७।
अजून नाही मी पूर्ण बरी
प्रगती आहे खूप तरी
काट्यांचा रस्ता आता मागे सोडला
मनाच्या पायवाटेवर पुन्हा गुलाब फुलला *।।८।।*
सुषमा सतीश गोखले, नवीन पनवेल







Be First to Comment