‘युनायटेड वे’ च्या वतीने 33 लाख रुपयांचा दहा बेडचे इंटेसिव्ह केअर युनिटचे लोकार्पण
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. या लाटेत उपचाराअभवी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. आता तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जाते. ही लाट विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक आहे. असेही सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर कर्जत उप जिल्हा रुग्णालयात मुंबई व हैदराबादच्या ‘युनायटेड वे’ च्या वतीने अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असलेल्या 33 लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या दहा बेडच्या इंटेसिव्ह केअर युनिटचे लोकार्पण करण्यात आले.
‘युनायटेड वे’ ने उभारलेल्या दहा बेडच्या इंटेसिव्ह केअर युनिटचे उदघाटन समारंभाचे आयोजन उप जिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, जिल्हा शल्य विशारद डॉ. सुहास माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, नितीन मंडलिक, जयवंत गायकवाड आदी उपस्थित होते. तर सेल्सफोर्सचे महाव्यवस्थापक जुझार सिंह, प्रोजेक्ट लीडर वसीम अख्तर यांनी ऑन लाईन उपस्थिती दर्शविली होती.

डॉ. बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात ‘ या दहा बेड आणि त्यासोबत दिलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा उपयोग कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा त्रास लहान मुलांना होणार आहे. त्यासाठी हा कक्ष उपयुक्त ठरेल. या कक्षाच्या बाजूलाच सध्या दहा बेडची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. असे स्पष्ट केले. सुवर्णा जोशी, वैशाली परदेशी -ठाकूर, डॉ. सुहास माने यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
जुझार सिंग यांनी, ‘भारत भारतातील ग्रामीण जिल्ह्यांच्या दीर्घकालीन आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. याचे आम्हाला समाधान आहे.’ असे सांगितले. वसीम अख्तर यांनी आपल्या मनोगतात, ‘कोविड बाधित हजारो कुटुंबांना त्वरित दिलासा देण्यासाठी सुरुवातीच्या काळात आम्ही सीओव्हीआयडी चाचणी व निदान साधनांचा पुरवठा करण्यात आम्ही आघाडीवर आहोत. कोविड विरुद्ध लढा देण्यासाठी ग्रामीण भागात अत्याधुनिक सेवा देण्यावर आमचा भर असून केवळ कोविड विरुद्ध लढा देण्यासाठीच नव्हे तर रुग्णालयात दीर्घ काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’ असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन उप व्यवस्थापक डॉ. शैलेश वागळे यांनी केले.








Be First to Comment