मृत्यू झालेले सर्व मुंबई कुर्ल्याचे,तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
मुंबई कुर्ला येथील सहा जण कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणाच्या जलाशयात पाणी पडणाऱ्या धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आले असता त्यातील तिघांचा आज 10 जुलै रोजी दुपारी बुडून मृत्यू झाला आहे.सायंकाळी नेरळ पोलिसांकडून त्या तीन मुलांचे मृतदेह सापडले असून कर्जत तालुक्यातील या पावसाळ्यात घडलेली दुसरी अपघात घटना आहे.
मुंबई कुर्ला येथील नानीबाई चाळ नौपाडा येथील सहा पर्यटक आज 10 जुलै रोजी वर्षासहली साठी कर्जत तालुक्यात आले होते. डिकसळ नाक्यावरून पाली वसाहत येथे चालत जाऊन सागाचीवाडी आणि चिंचवाडी ग्रामस्थ ज्या पायवाटेने आपल्या घरी जातात. तो रस्ता पाली धरणाच्या जलाशयाला लागून डोंगराच्या कडेने जातो.तो संपूर्ण रस्ता डोंगराला लागून असल्याने लहान धबधबे तेथे निर्माण झालेले आहेत. त्यातील पायवाटेवरील एका धबधब्यावर ते सहा जण दुपारी बारा च्या दरम्यान पोहचले होते.
धबधब्यावर मौजमजा करीत असताना त्यातील काही जण धबधब्याला पाणी कमी असल्याने पाली भूतीवली धरणाच्या जलशयात उतरले. ज्या ठिकाणी धरण तयार केले त्या ठिकाणी पाली गावाची वस्ती होती. त्या ठिकाणी खोलगट भाग असून जुन्या मोडून टाकलेल्या घरांचे अवशेष देखील आहेत.त्यामुळे त्या पाण्याचा अंदाज कोणालाही लागत नसल्याने वर्षासहली साठी आलेले पर्यटक हे त्या पाण्यात बुडाले. एकूण चार पर्यटक त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यात उतरले होते,मात्र त्यातील एक पाण्याच्या बाहेर येण्यात यशस्वी ठरला असून अन्य तिघांचा बुडून मृत्यू झाला.

साहिल हिरालाल त्रिभुके ( वय -15 ), प्रीतम गौतम साहू( वय -12 ), मोहन साहू ( वय -16 ) अशी तिघेजण बुडाले असल्याची माहिती स्थानिक आदिवासी लोकांनी कळविल्यावर नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले. स्थानिक आदिवासी लोकांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू असून संध्याकाळी बुडालेल्या तरुणांचा शोध लागला त्यात पाऊस अद्याप पूर्ण जोमाने सुरू झाला असल्याने धरणात देखील पूर्ण क्षमतेने पाणी नाही. मात्र खोलगट भाग असून पुढे खोल पाणी असल्याने अंदाज न आल्याने ते तिघे बुडाले. शेवटी नेरळ पोलिसांनी खोपोली येथील रेसेक्यु अपघातग्रस्त पथक पोलिसांच्या मदतीला पोहचले होते. त्या पथकात गुरुनाथ साठलेकर, भक्ती साठलेकर,विजय भोसले , राजेश पारठे, दर्श, शुभम कंगले , हनिफ भाई, दिनेश ओसवाल,अमोल ठकेकर, कार्तिक गोयल, अनिल सावंत, अमीत गुजरे, अमोल कदम, दीपक पाटील आदी होते. त्यांनी सायंकाळी साडे सहा वाजता पाण्यात उतरून शोध कार्य करण्यास सुरुवात केली. सात वाजता पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर उर्वरित दोघांचे मृतदेह सापडले.
घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक अनिल घेरडीकर, नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय बांगर, उपनिरीक्षक मुळीक यांच्यासह पोलीस आणि स्थानिक आदिवासी आणि डिक्सळ परिसरातील कार्यकर्ते मदतीसाठी घटनास्थळी होते. खरे तर धरण, धबधब्यांवर जाण्यास बंदी आहे तरीही ही मुले तेथे गेलीच कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे.












Be First to Comment