सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण पनवेल रस्त्यावरील बोकडविरा येथील सिडको कार्यालयासमोर असलेला साकव धोकादायक बनल्याने अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी लोखंडी कमान बसविण्यात आली होती. सदरच्या कमानीचा एक भाग कोसळल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहने ये जा करण्यास मोठी अडचण भासत आहे. तरी हा अडथळा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सिडकोचा फुंडे गावाजवळचा पूल कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बोकडविरा येथील सिडको कार्यालया जवळ असलेला साकव ही कमकुवत झाल्याने तो अवजड वाहनांना बंद करण्यात आला होता. परंतु तरीही अवजड वाहनांनाची वर्दळ सुरूच होती. याबाबत उरण मनसेने इशारा देत ठोस कारवाईची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडकोकडे केली होती.

त्याची दखल घेऊन अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी काल लोखंडी कमान बसविण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहने भेंडखळ मार्गे वळविण्यात आली आहेत. परंतु कमान बसवून २४ तास होण्याच्या आधीच कमानीचा एक भाग रस्त्यावर कोसळला आहे. ही घटना पहाटेची असल्याने दुर्घटना टळली आहे. यावरून शासकीय अधिकारी किती बेफिकीर आहेत ते उघड होत असल्याची चर्चा वाहन चालकांत सुरू आहे.

कमान रस्त्यावर पडल्याने आज सकाळपासून छोटी वाहने ये जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच अंबुलन्स ही घेऊन जाणे कठीण बनले आहे. तरी संबंधित खात्याने याची दखल घेऊन रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडको अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.








Be First to Comment