सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |
नवी मुंबईतील पहिली हृदयशल्यचिकित्सा करणाऱ्या नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर्स दिनानिमित्त सुप्रसिद्ध हृदयशस्त्रक्रियातज्ञ डॉ नित्यानंद ( नितू ) मांडके यांच्या आठवणीला उजाळा दिला गेला. यावेळी शुश्रूषा हार्ट केयर सेन्टरचे संचालक डॉ. संजय तारळेकर व त्यांच्या पत्नी डॉ. अनिता तारळेकर यांना हॉस्पिटलच्या वतीने तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
गेल्या अठरा वर्षांपासून शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व स्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवी मुंबई, ठाणे व रायगड तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या शेकडो रुग्णांवर यशस्वी उपचार करीत आहेत. शुश्रूषा हार्ट केयरचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कॅथ लॅब व ऑपेरेशन थिएटरला डॉ. नितू मांडके यांचे नाव दिले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर सांगतात, ” राज्याच्या, देशाच्या कानाकोप-यांतून जगाच्या विविध देशातून डॉ नितू मांडके यांच्याकडे पेशंट यायचे, मला त्यांचा जास्त सहवास लाभला नसला तरी हृदयशल्यचिकित्सेत मी त्याना गुरुस्थानी मानतो़. पेशंटच्या बाबतीत डॉक्टरांनी गरीब- श्रीमंत असा भेद कधीच केला नाही; येणारा रुग्ण डॉक्टर म्हणून आपल्याकडे विश्वासाने येतो म्हणूनच तो लवकर बरा व्हायला हवा या वैद्यकीय सूत्राचे डॉक्टर आग्रही होते व त्यांच्या या सूत्राचे मी आजही पालन करीत असून अनेक गरीब रुग्णांवर अल्प दरात शल्यचिकित्सा करीत आहोत.
डॉ. नितू मांडके यांच्या कामाचा वेग, चपळाई पाहून मी अनेक वेळा भारावून गेलो आहे. हृदयविकार असलेल्या रुग्णाशी प्रथम संवाद साधला पाहिजे त्यामुळे रुग्णाचा मानसिक तणाव निघून जातो व त्याचा फायदा आपल्याला सर्जरी करताना होतो अशी सहज सोपी वैद्यकीय विचारधारा त्यांनी २० वर्षांपूर्वी मांडली होती व भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्राला प्रसिद्धीचे वलय दिले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रसिद्ध खेळाडू व सिनेतारकांच्या शस्त्रक्रिया डॉ नितु मांडके यांनी यशस्वीरीत्या केल्या आहेत. जाज्वल्य आत्मविश्वास, प्रचंड चिकाटी, अविरत काम करण्याची अतुलनीय जिद्द ही डॉ नितु मांडके यांची गुण वैशिष्टय होती.” हजारो किचकट ह्दयशस्त्रक्रिया लिलया सफाईदारपणे करणा-या या जिंदादिल डॉक्टर अवलियाला मात्र हार्ट अॅटकनेच अवेळी घेऊन जावं हा मोठा दैवदुर्विलास असून भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील मोठी शोकांतिका आहे.








Be First to Comment